सावंतवाडी : पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. स्थानिक व्यापारी पर्यटन वाढविण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवित असेल, तर शासन मालवणच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल का करीत आहे? त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे रद्द करावेत व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी रविवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेण्याचा निर्णय सावंतवाडी येथे आयोजित सिंधुदुर्ग पर्यटन विकास संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनची बैठक नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात शनिवारी झाली. यावेळी डी. के. सावंत, फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जितेंद्र पंडित, दीनानाथ रावजी बांदेकर, नितीन तळवणेकर, बाळासाहेब परूळेकर, नकुल पार्सेकर, इप्तेश्वार इब्राहिशा राजगुरू, अशोक देसाई, शेखर गोवेकर, भाई देऊलकर, राजू लाड आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पर्यटकांसाठी चांगले प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, सर्व प्रकल्प बंदावस्थेत असल्याने जिल्ह्यात पर्यटकांची संख्याही कमी होत चालली आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजनांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विविधा सुविधा देणे, तितकेच आवश्यक आहे. यासाठी लॉजिंग बोर्डींग, हॉटेलवरील टॅक्स कमी होणे, उभारलेल्या पर्यटन प्रकल्पांचे अनामत मासिक भाडे कमी करावे, स्वयंसंस्थांना उभारी अशा विविध मागण्यांसंदर्भात रविवारी सकाळी ९ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच मालवण तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा स्थानिक व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेली कित्येक वर्षे पर्यटक टिकविण्यासाठी अनेक सोयी सुविधा स्थानिक व्यापाऱ्यांनी पुरविलेल्या आहेत. मात्र, आता या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे म्हणजे अत्यंत चुकीचे असून पर्यटकांची संख्या कमी होऊ शकतो. यामुळे लादण्यात आलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटनस्थळांचा व त्याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. यामुळे सर्व सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहे. पर्यटन जिल्हा घोषित होऊन १८ वर्षे पूर्ण झाली. तरीही पर्यटन विकास म्हणावा, तेवढा जिल्ह्यात झालेला नाही. (वार्ताहर)
पर्यटन निधीचा योग्य वापर करण्याची मागणी
By admin | Published: March 29, 2015 9:22 PM