पाटण : पाटण शहरासह तालुक्याच्या इतर विभागांतील बाजारपेठेत मंडळे व ग्रुपच्या नावाखाली सण समारंभांच्या निमित्ताने कमीत कमी हजार रुपयांची सरसकट वर्गणी गोळा करण्याचे लोण पसरले आहे. वर्गणी गोळा करणारे हात मोठे व्यापारी, दुकानदार, लक्झरी बसचालक, पवनचक्की व्यावसायिकांसह अनेकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. इतर छोट्या दुकानदारांनाही या वर्गणी मागणाऱ्यांचा मोठा फटका बसत आहे. सध्या यात्रा, महाशिवरात्री, शिवजयंती व इतर धर्मीयांचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले. त्यातच गल्लीबोळात चार चौघांनी मिळून निर्माण केलेले ग्रुप व संघटना यांनी अशा सणांचा गैरफायदा घेऊन आपल्याच आजूबाजूच्या दुकानदार व इतर धनिकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. मोठी मंडळे तर थेट मोठ्यांच्या दारात जाऊन मोठी मागणी करताना दिसत आहेत.या प्रकाराला अनेकजण वैतागले असून, तक्रार करायची कोणी? या भीतीपोटी या वर्गणी गोळा करणाऱ्यांचे फावले आहे. पाटण शहरातील लक्झरी बसवाले या वर्गणीवाल्यांना तर वैतागले असून, जसा सण येईल तशी पाचशे किंवा हजाराची नोट वर्गणी मागणाऱ्यांना देत आहेत. त्यातच अनेक ग्रुप व मंडळे त्यांची वेगवेगळी मागणी असल्याने कोणालाही नाही म्हणणे अवघड बनले आहे. वर्गणी देण्यास नकार दिला तर तोडपाणीची भाषा किंवा उद्यापासून धंदा बंद करायची धमकी, अशा घटना सर्रास घडत आहेत. अशा दहशतीविरोधात कोणीही पोलिसांत तक्रार द्यायलाही पुढे धजावत नाही. याप्रकरणी पोलिसांनीच हस्तक्षेप करून संबंधित टोळीवर अंकुश बसवावा, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक करत आहेत. (प्रतिनिधी)भीतीमुळे दुकानेही बंद पाटण शहरात परराज्यातून आलेले व्यावसायिक व सरकारी कार्यालये यांची संख्या मोठी आहे. यामुळे आर्थिक मदत केली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त होत आहे. पण कितीवेळा कोणाकोणाला वर्गणी द्यायची, याचा मेळ बसत नसल्यामुळे अतिरेक होत असल्याचे व्यापारी नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.वर्गणी मागणाऱ्यांच्या भीतीपोटी दुकान बंद ठेवावे लागते. अनेक छोट्या दुकानदारांवर असे प्रसंग आले आहेत. ज्यांना दिवसभरातील व्यावसायातून शे-पाचशे रुपये मिळतात, त्यांना वर्गणी पोटी दिवसातून तीन-चार वेळा पैसे द्यावे लागत असतील तर मग दुकान बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
वर्गणी गोळा करणाऱ्या हातांची हजारांत डिमांड
By admin | Published: February 20, 2015 9:50 PM