देवरुख : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तब्बल चार अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्याची नगराध्यक्ष पदाची टर्म ही सेनेची असतानादेखील भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला गेल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. या चुरशीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असून, अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल चार अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे प्रमोद पवार, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल भुवड, शिवसेनेचेच नंददीप बोरुकर आणि भाजपचे नीलेश भुरवणे या चार नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या छाननीत चारही अर्ज वैध ठरले आहेत.देवरुख नगरपंचायतीची पहिली निवडणूक एप्रिल २०१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीकरिता महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी देवरुख नगरपंचायत निवडणुकीत सेना - भाजपने वर्चस्व प्रस्थापित करत १७ पैकी १२ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. सध्या नगरपंचायतीत सेना - भाजप १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५ असे पक्षीय बलाबल आहे. त्यावेळी सेना - भाजप यांनी सव्वा वर्षांचे चार टर्म विभागून आलटून - पालटून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी काम करण्याचा अलिखीत करार केला होता. पहिल्या टर्मला नगराध्यक्षपदी सेनेच्या नीलम हेगशेट्ये तर दुसऱ्या टर्मला भाजपच्या स्वाती राजवाडे विराजमान झाल्या. सध्या सेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणे आवश्यक होते. युतीत झालेल्या कराराप्रमाणे या टर्ममध्ये सेनेचा नगराध्यक्ष विराजमान व्हावा अशी सेनेची अपेक्षा आहे.मंगळवारी दाखल झालेल्या नामनिर्देश पत्रांमुळे ‘वन टु का फोर’चे संकेत मिळत आहेत. एका जागेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने देवरुखवासियांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीदरम्यान युतीच्या बैठकीमध्ये कोणता उमेदवार अर्ज मागे घेतो की, चारही अर्ज तसेच राहतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.या साऱ्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या एका बड्या नेत्याने लक्ष घातल्याने ही निवडणूक आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे. (प्रतिनिधी)
देवरुख नगराध्यक्ष निवडणूक चुरशीची?
By admin | Published: October 21, 2015 11:33 PM