कुडाळ : सिंधुदुर्गातील लोकपरंपरा वैशिष्ट्यपूर्ण असून येथील रोंबाट व राधानृत्याला गोव्यात सादरीकरणासाठी नेणार, असे आश्वासन गोव्याचे आमदार दामोदर नाईक यांनी कुडाळ येथील भाजपाच्यावतीने आयोजित शिमगोत्सव महोत्सवात केले. या महोत्सवाला रसिक प्रेक्षकांची गर्दी केली होती. रोंबाट स्पर्धेत कलेश्वर गु्रप प्रथम, तर राधा नृत्य स्पर्धेत गावडोबा मित्रमंडळ, माड्याचीवाडीने प्रथम क्रमांक मिळविला. कुडाळ तालुका भाजपाच्यावतीने काका कुडाळकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ ‘शिमगोत्सव २०१५’ चे आयोजन शनिवारी रात्री केले होते. या शिमगोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे आमदार तसेच गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष दामोदर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, काका कुडाळकर, नीलेश तेंडुलकर, संतोष शिरसाट, भाऊ शिरसाट, बंड्या सावंत, चारू देसाई, अमृत सामंत, जगदीश उगवेकर, दीपक कुडाळकर तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या रोंबाट स्पर्धेत नेरूर येथील कलेश्वर कला क्रीडा मंडळाचा प्रथम, विलास मेस्त्री मित्रमंडळ, नेरूरचा द्वितीय क्रमांक, तर आेंकार मंडळ, वाघचौडी मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. तर राधानृत्य स्पर्धेत गावडोबा मित्रमंडळ माड्याचीवाडी यांना प्रथम, द्वितीय क्रमांक समंध प्रासादिक भजन मंडळ, नेरूर, तर तृतीय क्रमांक ठाकर समाज-गुढीपूर पिंगुळी यांनी पटकाविला. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या रोंबाट व राधा नृत्य स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तालुक्यात सात संघांनी रोंबाट स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये आेंकार मंडळ वाघचौडी, मोडेश्वर मंडळ वाघचौडी, नेरूर येथील विलास मेस्त्री गु्रप, कलेश्वर गु्रप, कलेश कलामिनार ग्रुप व आंब्रड येथील भगवतीदेवी मंडळ, मुळदे शिमगोत्सव मंडळाने सहभाग घेतला होता. तर राधानृत्य स्पर्धेत पिंगुळी येथील ठाकर समाज, ठाकर समाज, ठाकूरवाडी, नेरूर येथील समंध प्रासादिक भजन मंडळ, मोहन पारकर मंडळ, नीलेश वालावलकर ग्रुप, परूळे येथील विश्वकर्मा कलानिकेतन ग्रुप, ब्राम्हणदेव ग्रुप व मांडेश्वर मंडळ, तेंडोली, आदिनारायण मंडळ, वालावल, ब्राम्हणसेवा मंडळ, पांग्रड, खरवतेवाडी-तेंडोली, गावडोबा मित्रमंडळ (माड्याचीवाडी), घोंगडेश्वर मंडळ, वालावल, गांगेश्वर मंडळ, माड्याचीवाडी या १६ संघांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच जिल्ह्यात अशाप्रकारे आयोजित केलेले रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट राधा म्हणून गुढीपूर-पिंगुळी ठाकूरवाडी, घुमट वाद्यकलाकार-पांग्रड ग्रुप, गणेश-समंध प्रासादिक भजन मंडळ, शंखासूर-कलेश कला मिनार नेरूर ग्रुप, सर्वोत्कृष्ट मारुती-सोंडेश्वर मंडळ या मंडळांच्या कलाकारांना गौरविण्यात आले. विजेत्या कलाकारांना सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन बाळ पुराणिक व राजा सामंत यांनी केले. (प्रतिनिधी)पारंपरिकतेचे दर्शन रोंबाट व राधानृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा, रंगभूषा, वाद्ये, गाणी, अभंग, नृत्य, कथा-कथी यांचे सुंदर दर्शन रसिक प्रेक्षकांना घडविले. यावेळी बोलताना गोव्याचे आमदार दामोदर नाईक म्हणाले, कला व संस्कृती टिकविण्याचे काम भाजप नेहमीच करीत आले असून, यापुढेही करणार आहे. आपल्या कला, संस्कृती नव्या पिढीने पहाव्यात, त्यांना त्यांची माहिती व्हावी, हा महोत्सवाचा उद्देश आहे.
सिंधुदुर्गातील लोकपरंपरा वैशिष्ट्यपूर्ण : दामोदर नाईक
By admin | Published: March 15, 2015 9:46 PM