सिंधुदुर्ग : भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व्या नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून ०४ डिसेंबर २०२३ रोजी तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
नौदलाची युद्धनौका २७ नोव्हेंबर २०२३ ते ०३ डिसेंबर २०२३ दरम्यान तालीम देखील करतील यामध्ये किनार्याजवळील मार्गांचा समावेश असणार असल्याचे नौदलाचे संपर्क अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.या संदर्भात कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी २७ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सर्व मासेमारी जहाजे, फेरी बोटी आणि जलक्रीडा चालकांना प्रात्यक्षिक क्षेत्रापासून दूर ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. नौदलाची युद्धनौका पूर्वाभ्यास सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर समुद्रामध्ये नांगर टाकून स्थानापन्न होतील.परिणामी, तटीय सुरक्षा पोलिसांनी सर्व मासेमारी जहाजे,फेरीबोटी आणि जलक्रीडा चालकांना किमान ०५ केबल्स अंतरावर नौदलाच्या युद्धनौकेपासून दूर ठेवावे. सहाय्यक मत्स्य आयुक्त, सिंधुदुर्ग आणि बंदर निरीक्षक, (मालवण) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी देखील स्थानिक मच्छिमार, वॉटर स्पोर्ट ऑपरेटर आणि फेरी चालकांमध्ये वरील ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.