सिंधुदुर्गनगरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक हे देशद्रोही असून समस्त शिक्षक पाट्या टाकणारे हमाल, मजूर आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पुणे येथील लेखक, उद्योजक व वक्ते प्रा. नामदेव जाधव यांच्याविरोधात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.१८ फेब्रुवारी २०१९ रोजी एका जाहीर कार्यक्रमात प्रा. नामदेव जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या शाळेतील शिक्षक हे देशद्रोही आहेत. ते शिक्षक मुलांना शिकवित नाहीत.
तसेच हे शिक्षक पाट्या टाकणारे हमाल व मजूर आहेत. डी. एड्., बी.एड्.ला यांना संस्थांनी लुटल्याने हे आता त्याचा वचपा काढीत आहेत, अशाप्रकारची बेताल, आक्षेपार्ह विधाने केल्याची चित्रफीत समाज माध्यमांमधून प्रसिद्ध झाली आहे.या संघटनांनी बुधवारी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेत प्रा. नामदेव जाधव यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख सभा आणि कास्ट्राईब कल्याण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमकसमाजात शिक्षकांची बदनामी करण्याच्या उद्देशाने व सवंग प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने अशी घृणीत वक्तव्ये नामदेव जाधव यांनी केली आहेत. तसेच समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक व कुचेष्टेचा व्हावा, अशी त्याची विकृत मनीषा असावी असा आरोपही या प्राथमिक शिक्षक संघटनांनी केला आहे.
स्वत:ला लेखक, उद्योजक व वक्ता म्हणविणाऱ्या नामदेव जाधव यांनी शिक्षकांवर आक्षेपार्ह विधाने करून आपल्या अकलेचे तारे तोडले असल्याने त्यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.