सिंधुदुर्ग : जिल्ह्यात डेंग्यू साथीचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील विविध भागात डेंग्यूने डोके वर काढले असून ऑगस्ट महिन्याच्या केवळ १० दिवसात जिल्ह्यात ३३ रुग्ण डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आदेशही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून राहिल्याने त्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत आहे. परिणामी त्या त्या भागात डेंग्यू बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जानेवारी ते आतपर्यंत ६३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३३ डेंग्यूचे रुग्ण हे १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीतील आहेत. गेल्या १० दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून आरोग्य विभागामार्फत दैनंदिन ताप सर्वेक्षण, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
सर्व तालुक्यात आवश्यक औषधसाठा उपलब्ध३३ रुग्ण सध्या उपचाराखाली असून खबरदारीचे उपाय म्हणून रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये विशेष काळजी घेतली जात असून दैनंदिन ताप सर्वेक्षण कीटक शास्त्रीय सर्वेक्षण व औषधोपचार करण्यासाठी बाधित भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत डास उत्पत्ती रोखण्यासाठीच्या उपाययोजना तत्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. डेंगूची साथ रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व सर्व तालुक्यात आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
कणकवलीत सर्वाधिक दहा रूग्णसिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ६३ डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील तब्बल ३३ रुग्ण हे गेल्या दहा दिवसात आढळले आहेत. यात दोडामार्ग ४, कणकवली १०, कुडाळ ६, मालवण २,सावंतवाडी ७ वैभववाडी २, वेंगुर्ला २ रुग्णांचा समावेश आहे.