सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसाने कुपवडे, शिवापूर, आसोली, होडावडे-वेंगुर्ले या पुलांवर पाणी आल्याने त्या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली, तसेच भूस्खलन होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. मसुरे मार्गावरील मायनेवाडी व तळाणीवाडी डोंगर भाग खचल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी समुद्रात उधाणसदृश स्थिती असल्याने लाटांचा वेग वाढला होता. देवबाग मोंडकरवाडी येथील लोकवस्तीत पाणी घुसण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड चराटकरवाडी येथील रेवती पांडुरंग चराटकर, आरोंदा मार्गावरील विनायक यशवंत चराटकर आणि कुडाळ शहरातील आंबेडकरनगरातील सहा घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, तर वेगुर्ले येथील आनंद रघुनाथ खोत यांच्या घरातील मातीच्या दोन भिंती कोसळल्याने २५ हजारांचे नुकसान झाले होते. देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी येथील सहा घरांमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे व समुद्राला उधाण आल्यामुळे समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रत्नमाला हरी नेसवणकर या वयोवृद्ध व अपंग महिलेला तिच्या घरामधून दुसऱ्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात गेल्या आठ दिवसांत पावसाची संततधार सुरू असून नदी, नाले, धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, ७० पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. केवळ अशा बाधित कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटिसांपलीकडे प्रशासन याचे गांभीर्य बाळगत नसल्याचेच दिसून येत आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे संबंधितांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)बांदा, शेर्ले परिसरात पुराचे पाणी शिरलेबांदा शहर व परिसराला मंगळवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बांदा शहरातील आळवाडी परिसरात तसेच शेर्ले परिसरातील पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. इन्सुली-सावंतटेंब येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती. महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे दरडीची माती पुन्हा रस्त्यावर आल्याने येथून एकेरी वाहतूक सुरू होती. शेर्ले येथील जुने कापई पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले.मसुरेत दोन डोंगर खचलेमालवण तालुक्यात सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक रस्तेमार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळच्या सत्रात दोन ते तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पडझडीच्या घटनाही वाढल्या असून, मसुरे मार्गावरील मायनेवाडी व तळाणीवाडी डोंगर भाग खचल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी समुद्रात उधाणसदृश स्थितीने लाटांचा वेग वाढला होता. देवबाग मोंडकरवाडी येथील लोकवस्तीत पाणी घुसण्याची घटना घडली आहे. ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थितीपावसामुळे कसाल नदीची पाणीपातळी वाढून संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच कुपवडे-शिवापूर येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. होडावडे-वेंगुर्ले मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. वेगुर्ले खवणे येथील आनंद खोत यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने २५ हजारांचे नुकसान, तर रामगड येथील सहदेव जाधव यांच्या घरावर घळणीचा भाग कोसळून २२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
देवबाग, मिठमुंबरीत समुद्राचे पाणी
By admin | Published: July 05, 2016 11:30 PM