सचिन मोहिते - देवरुख शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्शुरामवाडी आणि धावडेवाडीतील येथील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने देवरुख शहराला पाणीटंचाई जाणवत नाही. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पर्शुराम वाडीतील धरणातून देवरुखवासियांना पाणीपुरवठा होत आहे. गेल्या २-३ वर्षांपूर्वी देवरूखला पाणीटंचाई भासत होती. मात्र, धरणातील गाळ उपसल्यानंतर आता पाण्याचा साठा मुबलक आहे.ऐन उन्हाळ्याच्या अखेर मात्र देवरूख शहरातील मोगरवणे या वाडीला पाणीटंचाई निर्माण होते. मात्र, या मोगरवणे वाडीला अशावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. देवरूखवासियांना पर्शुरामवाडीतील धरणातून नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्वी देवरूखला ग्रुप ग्रामपंचायत होती. आता तीन वर्षांपासून नगरपंचायत झाली आहे. आता हा सारा कारभार आणि नळपाणी योजना नगरपंचायतीकडे हस्तांतरीत झाल्या आहेत. मात्र, नळपाणी योजनेचा विचार करता येणारी पाणीपट्टी आणि नळपाणी योजनेवर होणारा खर्च याचा विचार केल्यास ही नळपाणी योजना तोट्यातच चालवली जाते आहे. मेंटेनन्स, पाणी विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीजभाडे यांचा विचार करता तब्बल ६५ लाखांचा खर्च होतो आणि पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यास ४५ लाखांच्या घरात येते. यातील फरकाचा विचार केल्यास तब्बल २० लाखांच्या फरकात योजना तोट्यात चालवली जाते.देवरूखवासियांना दिवसातून एक वेळ पाऊण तास पाणी सोडले जाते. १७६० नळपाणी कनेक्शन धारकांना तब्बल १६ लाख लिटर पाणी दिवसाकाठी लागते. मात्र, हे पाणी सोडताना पर्शुरामवाडी धरणातून नजीकच्या फिल्ट्रेशन प्लँटमध्ये सोडले जाते. फिल्ट्रेशन प्लॅण्टच्या टाकीची क्षमता ३ लाख लिटर आहे आणि हे पाणी प्लॅण्टमध्ये फिल्टर होते.या दोन्ही धरणांचा विचार केल्यास धरणे सुस्थितीत असून २-३ वर्षांपूर्वी पाणी तुटवडा जाणवत असल्याने धरणातील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले होते आणि गाळ उपसा झाल्यानंतर पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली. त्यावेळेपासून पाणी मुबलक आहे. तसेच १५ वर्षांपूर्वी पाईपलाईन बदलण्यात आली होती. ही पाईपलाईन नव्याने बदलण्याचे काम चालू होणार आहे. येऊ घातलेल्या २४ बाय ७ योजनेंतर्गत आणि पाण्याचा वाढती मागणी, वाढती कनेक्शन याचा विचार करुन हे पाईप्स वाढविण्याबाबत सध्या विचार करण्यात आला आहे. जेणेकरुन पाण्याच्या दाबाचा विचार करुन आणि वाढती कनेक्शन विचारात घेऊन मोठे पाईप लवकरच टाकण्यात येतील. अलीकडील काळात नळपाणी योजनेची दुरुस्ती झालेली नाही.याखेरीज मोगरवणे, हसमवाडी, पठारवाडी आणि कोल्हेवाडी या वाड्यांना तेथीलच सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात मोगरवणे येथील आडामधील पाणी आटून आड कोरडा होतो. यावेळी मात्र या वाडीसमोर पाण्याचा प्रश्न उभा राहून मोगरवणे येथे पाणीटंचाई निर्माण होते. तर भौगोलिक रचनेमुळे पाण्याच्या दाबामुळे दत्तनगर आणि काही वाड्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. मात्र, देवरूख शहरामध्ये पाण्याच्या नियोजनाचा योग्य विचार होताना दिसतो आहे. देवरूखमध्ये सुमारे ५० टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकी हक्काच्या विहिरी आहेत. तसेच काही नागरिकांकडे स्वत:च्या खासगी बोअरवेल आहेत.मात्र, मोगरवणे वगळता अन्य वाड्यांमध्ये तितकासा पाणीप्रश्न दिसत नाही. देवरुख नगरपंचायतीच्यावतीने २४ बाय ७ म्हणजेच २४ तास मीटर पद्धतीने पाणी देण्याची योजना सध्या प्रस्तावित असल्याची माहिती नगरपंचायतीकडून उपलब्ध झाली आहे. तसेच मोगरवणे येथील आडातील पाणी आटल्याने त्यांना टँकर सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनीष सावंत यांनी दिली.शहरातील पर्शुरामवाडी, मोगरवणे, पठारवाडी, घोरपीवाडी, बागवाडी, कांजीवरा, क्रांतीनगर, रोहिदास आळी, कुंभ्यांचा दंड, नेहरुनगर, मोहल्ला, बौद्धवाडी, भोईवाडी, बाजारपेठ, खालची आळी, दत्तनगर, केशवसृष्टी, भुवड कॉलनी, अमृतनगर, कांगणेवाडी, हसमवाडी, बोटकेवाडी, कोल्हेवाडी, तेलीवाडी, तांबळवाडी, भायजेवाडी, कुंभारवाडी, भोरपवणे, गेल्येवाडी, वरचीआळी, मोरेवाडी, शिंदेवाडी, मधलीवाडी, मांडवकरवाडी, वाणीवाडी आदी ३५ वाड्यांना देवरुख नगरपंचायतीकडून नळपाणी योजनेद्वारे पाऊण तास पाणीपुरवठा केला जातो. मे महिन्याअखेर १५ मिनिटे पाणी कपात करण्यात येते.बोअरवेलचा निश्चित आकडा नाही देवरुख शहराची लोकसंख्या १३,०८५ इतकी असून ही जवळजवळ ३५ वाड्यांमध्ये विभागली आहे. या देवरुख शहरात १७६० नळकनेक्शनधारक आहेत. तर सुमारे ४२७ खासगी विहिरींचा समावेश आहे तर ३ विहिरी सार्वजनिक आहेत. तर ३ सार्वजनिक बोअरवेल आहेत. तसेच खासगी बोअरवेलचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. देवरूख नगरपंचायत झाल्यानंतर या भागाला शहराचा दर्जा देण्यात आला असून शहरवासियांना आता परशुरामवाडी धरणातील पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे या भागात पाणी टंचाई बासत नाही.
देवरुख शहरवासियांना मुबलक पाणी
By admin | Published: April 26, 2015 10:05 PM