सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या एकूण ९ उमेदवारांपैकी अल्प मते मिळालेल्या ७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर यामध्ये विजयी झालेले महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि त्यांच्या खालोखाल मते मिळविलेले; पण पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची अनामत रक्कम सुरक्षित राहिली आहे. मागील निवडणुकीत ९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.१८व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ९ उमेदवार उभे होते. यात राजेंद्र लहू आयरे, नारायण तातू राणे, विनायक भाऊराव राऊत, अशोक गंगाराम पवार, मारुती रामचंद्र जोशी, सुरेश गोविंदराव शिंदे, अमृत अनंत तांबडे (राजापूरकर), विनायक लहू राऊत, शकील सावंत यांचा समावेश आहे.मंगळवारी शहरातील अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया झाली. यापैकी महायुतीतर्फे उभे असलेले नारायण राणे यांना सर्वाधिक ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत पराजित झाले. मात्र, त्यांना ४ लाख ६५६ मते मिळाली. त्यामुळे या दोघांची अनामत रक्कम सुरक्षित राहिली आहे. मात्र, उर्वरित ७ जणांना एक अष्टमांश मतेही मिळविता न आल्याने, त्यांची अनामत रक्कम शासनजमा झाली आहे.
निवडणूक लढविण्यासाठी डिपॉझिट किती?
- लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना २५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते. या निवडणुकीत ७ जणांना इतकी रक्कम भरावी लागली होती.
- या निवडणुकीत ‘बसपा’चे राजन आयरे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार हे मागास प्रवर्गातील असल्याने, त्यांनी १२,५०० एवढी अनामत रक्कम भरली होती.
मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणातलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ९ उमेदवार रिंगणात होते.
०७ जणांचे डिपॉझिट जप्तलोकसभा निवडणूक लढविणाऱ्या ७ उमेदवारांना एक अष्टमांश मते न मिळविता आल्याने, ७ जणांची अनामत रक्कम शासन तिजोरीत जमा झाली आहे.
कोणाचे किती डिपॉझिट जप्त?
- राजेंद्र लहू आयरे १२,५००
- अशोक गंगाराम पवार १२,५००
- मारुती रामचंद्र जोशी २५ हजार
- सुरेश गोविंदराव शिंदे २५ हजार
- अमृत अनंत तांबडे (राजापूरकर) २५ हजार
- विनायक लहू राऊत २५ हजार
- शकील सावंत २५ हजार