कणकवली (सिंधुदुर्ग) : अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना माझ्या खात्याला किती निधी मिळतो, याची कल्पना नाही. अशा शब्दांत राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलो नाही. त्यांच्याकडे नंतर बघू, असा इशाराही त्यांनी दिला. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कणकवली येथे रविवारी पत्रकार झाली. संजय राऊत आज शिवसेनेची वाट लावत आहेत. ते पक्षाला खड्ड्यात नेत आहेत, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी १५ दिवस गाडीत झोपलो-
जेव्हा शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करून मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता, तसेच दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली होती. तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला होता आणि ‘नारायण, जसा असशील तसा निघून ये,’ असे सांगितले होते. बाळासाहेब तेव्हा काही दिवस अज्ञातवासात होते आणि त्यांना मी सुरक्षा देत होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी १५ दिवस आंघोळ न करता, जे मिळेल ते खात होतो आणि गाडीतच झोपत होतो. हे सारे बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केले होते, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.दरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी झालेल्या सर्व प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे आज हजेरी लावणार आहेत.
‘राणे केंद्रीय मंत्री, त्यांनी त्यांचे काम करावे’-
नारायण राणे यांच्याबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. आम्हाला सरकार चालवायचे आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्याचे काम करावे. एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीमध्ये काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते यात्रा काढा म्हणून सांगतात. त्यामुळे कोरोना वाढल्यास कोण जबाबदार आहे, याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये सण साजरे होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी न करता कोरोना नियमांचे योग्य ते पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा गर्दी होऊन कोरोना वाढला तर कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडचा विस्तार झपाट्याने हाेत आहे. भविष्यात दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल. हडपसर आणि चाकणमध्ये सुविधांची उभारणी करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.