सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षात आमचे प्रश्न ऐकून घेतले पण सोडवले नाहीत पंधरा दिवसापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतो असे पुन्हा आश्वासन दिले. परंतु त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे दुसरीकडे मागून मिळत नाही घरी आल्यानंतर तरी देतात का नाही ते बघूया म्हणून आम्ही त्यांच्या दारात येवून अधिवेशन घेण्या
चा निर्णय घेतला. परंतु तेच आले नाहीत, अशा शब्दात आपली नाराजी राज्य संघटनेचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी अधिवेशनात बोलून दाखवली सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर रविवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी अधिवेशनाला आमदार विक्रम काळे सह आमदार निरंजन डावखरे आदिनी भेट दिली तर उद्योजक विशाल परब अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या अधिवेशना ला राज्यभरातून पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आले होते.
खांडेकर म्हणाले,मंत्री केसरकर यांनी आम्हाला दिलेली आश्वासने अर्धवट ठेवली. मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमतः आपण प्रश्न समजून घेतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षभर आम्ही गप्प राहिलो. परंतु आता कारकीर्द संपण्याची वेळ आली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला नाराज केलात तर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्राचे आर्थिक गणित कोलमडेल असे काही मागत नाही. बारा, चोवीसचा प्रश्न किंवा दहा, वीस, तीसचा प्रश्न सोडवण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. याबाबत मंत्री केसरकर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन दिले होते. तसेच पंधरा दिवसात हे दोन्ही प्रश्न आपण सोडवतो, तसा शासन अध्यादेश काढतो, असे आश्वासन दिले होते. परंतु या घटनेला अनेक महिने उलटले तरी अद्याप पर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे किमान त्यांच्या घरी गेल्यानंतर तरी ते देतील असे वाटल्यामुळे आम्ही सावंतवाडीत अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आजच्या अधिवेशनात ते आले नाहीत.अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
आमदार काळे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीची भरती नको, तर पूर्णवेळ पदे भरा. त्यांना म्हातारपणाची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना आधार द्या, असे आवाहन काळे यांनी केले तर आमदार निरंजन डावखरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे, असे स्पष्ट केले.तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न मोठे ते सोडवले गेले पाहिजेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.