सचिन मोहिते - देवरुख -व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गोठणेवासियांना अजूनही वनवासच भोगावा लागत असून, मुलभूत सुविधांअभावी त्यांची परवडच होत आहे. हातीव गावठाण येथील पुनर्वासितांसाठी शाळा मंजूर असताना देखील सध्या येथे समाजमंदिर आणि झोपडीवजा घरामध्ये दाटीवाटीने वर्ग भरवण्याची वेळ निर्माण झाली आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक शासन व प्रशासन यापैकी कोणालाही नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गोठणेवासियांचे २५ मे २०१५ रोजी पुनर्वसन करण्यात आले आणि यावेळी हे गोठणेवासीय तीन ठिकाणी जैतापूर, दाणोळी आणि संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावठाण येथे पुनर्वसित झाले. हातीव गावठाण या ठिकाणी सुमारे ८५ पेक्षा अधिक कुटुंबे या ठिकाणी पुनर्वसित झाली. २५ मे २०१२ ला पुनर्वसित झाल्यानंतर त्यांना मुलभूत सुविधा मिळणे गरजेच्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने गांभीर्याने त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने आजही २७ लाखांची शाळेसाठी इमारत २०१३मध्ये मंजूर असताना देखील एका खोपटामध्ये शाळा भरवण्याची वेळ तेथील शिक्षकांवर येवून ठेपली आहे.पुनर्वसित गोठणेवासियांची मुले ही तीन किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर पायदळी तुडवत निवे बु. येथील शाळेत जात होती. मात्र, त्यांची होणारी फरफट लक्षात घेऊन त्यांची समस्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी मांडल्यानंतर त्या पुनर्वसित परिसरातच शाळा भरु लागली. सध्या पुनर्वसितांसाठी मिळालेल्या जागेमध्ये २७ लाख रुपये शाळेच्या इमारतीसाठी मंजुर असताना देखील शाळेच्या बांधकामाला अद्यापही का प्रारंभ झाला नाही, याचे उत्तर गोठणे पुनर्वसितांना अद्यापही सापडलेले नाही.एकीकडे शाळा इमारतीचा पत्ताच नसताना दुसरीकडे अद्ययावत अशी किचन शेड मात्र उभारण्यात आली आहे. असे असताना शाळा इमारतीच्या बांधकामाचे घोडे कुठे अडले आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शाळा इमारतीकरिता चर आणि पिलरसाठी खोदाई करण्यात आल्याचे दिसत आहे.मात्र, प्रत्यक्षात या इमारतीला केव्हा प्रारंभ होणार हे शिक्षण विभागाला वा बांधकाम विभाग यापैकी कोणालाच माहित नाही. सध्या या सात वर्गांत २९ विद्यार्थी असून, चार शिक्षक या ठिकाणी शिकवत आहेत. मात्र, सुसज्ज इमारत तसेच लाईट नसल्याने तारेवरची कसरत करत एकाच झोपडीत आणि समाजमंदिरात दाटीवाटीने वर्ग भरवण्यात येत आहेत. शासन याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल केला जात आहे.झोपडीत वर्ग : समाजमंदिरात भरते शाळासंगमेश्वर तालुक्यातील हातीव गावठाण या ठिकाणी आम्ही गोठणे सोडून आल्यास साडेतीन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, पायाभूत व मुलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून अगदी धिम्या गतीने ही प्रक्रिया सुरु असल्यानेच आम्हाला या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.- प्रकाश उंडे, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीसध्या पहिली ते सातवीपर्यंतची पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा हातीव गावठाण पुनर्वसन येथे भरत असून, ही शाळा ग्रामस्थांनी उभारलेल्या समाज मंदिरात आणि ग्रामस्थांचे देवस्थान असलेल्या झोपडीमध्ये काही वर्ग भरवण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी कसेबसे बसून याठिकाणी अभ्यास करतात. सध्या ही एक शिक्षकी शाळा आहे.प्रारंभच नाहीयेथील शाळेसाठी इमारत मंजूर आहे. त्यासाठी जमिनही उपलब्ध आहे. पण त्या जमिनीवर केवळ चर मारण्यात आले आहेत. त्यापुढे काम गेले कित्येक महिने सरकलेलेच नाही. त्यामुळे शाळेची इमारत कधी होणार? असा सवाल केला जात आहे.
गोठणेवासीयांच्या नशिबी अद्याप वनवासच!
By admin | Published: October 11, 2015 10:13 PM