बांदा : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला गेली दहा वर्षे अध्यक्षच नव्हता. त्यामुळे देवस्थान संबंधी अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले होते. गाव-हाटी, देवस्थान विषयी वाद, देवस्थान जमीन मालकी वाद आदी प्रश्नांबरोबरोबरच देवस्थानाचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न रखडले. मात्र यापुढे असे होणार नाही, तुमच्या समस्या तात्काळ निवारण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी बांदा येथे दिली.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रलंबित प्रश्न व समस्या यावर चर्चात्मक तोडगा काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बुधवारपासून जिल्ह्यात आली आहे. बांदा येथील माऊली मंदिरात आयोजित या बैठकीत उपस्थित नागरिक व मानकरी पदाधिकारी यांनी मांडलेल्या मुद्यांवर महेश जाधव बोलत होते. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी बी. एन. पाटील, संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, समितीचे सचिव पवार, शिवाजी साळवी, उपअभियंता सुरेश देशपांडे, कनिष्ठ अभियंता सुदेश पाटील, शीतल इंगवले, महादेव दिंडे, माजी आमदार राजन तेली, भाजप माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, महेश सारंग, एस. आर. सावंत आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील १९९ देवस्थानचा कार्यभार आमच्या समितीकडे असून ही मंदिरे आणि देवस्थाने सुसज्ज आणि सुंदर कशी होतील यासाठी तुमच्या सहकार्याने प्रयत्न करू या, असे आवाहन जाधव यांनी केले.यावेळी जगदीश मांजरेकर यांनी सावंतवाडी येथे असलेले समितीचे कार्यालय काहीही कामाचे नसल्याचा आरोप करीत येथील कर्मचारी उद्धट उत्तरे देतात. आम्ही दिलेली समस्यांची निवेदने मुख्य समितीपर्यंत पोहोचवलीच जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच अभिलाष देसाई, रामदास नाईक, मंथन गवस यांनीही देवस्थानच्या देवराई, उपसमिती निवड, ना हरकत दाखले आदी समस्या उपस्थित केल्या. अतुल काळसेकर यांनी कोकणातील देवस्थाने पारंपरिक पद्धतीने चालविली जात असून स्वत:ची पदरमोड करून या देवस्थानांच्या उपसमितीचे पदाधिकारी हा गाडा पुढे हाकत असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी देवस्थान समितीने प्रयत्न करावेत आणि दर तीन महिन्यांनी जिल्ह्यात दौरा करून समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी केली.माजी आमदार राजन तेली यांनी येथील देवस्थानांना कमीत कमी पाच लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी करीत देवस्थानच्या समस्यांचा निपटारा लवकरात लवकर कसा होईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. या मुद्यांना अनुसरून समिती अध्यक्ष जाधव यांनी यापूर्वी जे झाले ते झाले. सावंतवाडी येथील समितीचे कार्यालय येत्या चार महिन्यात सुसज्ज व अद्ययावत केले जाईल असे आश्वासन दिले. ज्या देवस्थानच्या जमिनीत लोकवस्ती आहे आणि त्यांना केवळ ना हरकत दाखला मिळत नसल्याने शासकीय योजना राबवता येत नाहीत अशांचा विचार समिती नक्की करून ना हरकत दाखल्यांचा निर्णय दिला जाईल अशी ग्वाही दिली.सावंतवाडी येथील कार्यालयातील गैरसोयीबद्दल त्यांनी व्यवस्थापकांना इशारा देताना तुमच्याकडे आलेली समस्यांची निवेदने चार दिवसात कोल्हापूर येथील कार्यालयात पोहोचलीच पाहिजेत. यात जर कमतरता आढळली तर मला माझ्या अधिकाराचा वापर करावा लागेल असा सज्जड इशारा दिला. यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले आदी तालुक्यातील देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दक्षता घेणे आवश्यकदेवराई किंवा देवस्थानच्या जमिनी या कोणाच्या मालकीच्या होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगत देवस्थानच्या निगडित जे काम करतात तसेच जे मानकरी आहेत त्यांना त्यांच्या उदरनिवार्हासाठी दिलेल्या आहेत. त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.
देवस्थानांच्या समस्या प्रलंबित राहणार नाहीत- महेश जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 9:59 PM