कणकवली : इतर राजकारण्यांप्रमाणे फक्त निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासने न देता भाजपप्रणित केंद्र शासनाच्या गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकोपयोगी ५२ नवीन योजना सुरू केल्या आहेत. तसेच या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. त्यातीलच एक प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना असून, लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात कणकवली तालुका भाजपची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, एस. टी. सावंत उपस्थित होते.यावेळी अतुल काळसेकर म्हणाले, भारत देशाच्या इतिहासात पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जनता त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमात सहभागी होते. हे प्रथमच घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सिंधुदुर्गातील १७ हजार गॅसधारकांनी सबसिडी सोडली आहे. हे त्याचेच द्योतक आहे.विकासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाताना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गोवा या राज्यांत पंतप्रधानांनी सुरू केली आहे. आता महाराष्ट्रात तिचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील महिलेच्या नावाने डिपॉझिटशिवाय मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर मिळणाऱ्या शेगडी आणि पहिल्या सिलेंडरचे पैसे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीतून प्रत्येक महिन्याला कपात करून घेतले जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांवर त्याचा बोजा पडणार नाही. आपल्या जवळच्या गॅस एजन्सीत गेल्यावर लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही. हे सहज समजू शकणार आहे. या योजनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आढाव्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ओरोस येथे ५ जुलैला जिल्ह्यातील गॅस वितरकांची बैठक बोलाविली आहे. तसेच या योजनेचा सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर 'धूर मुक्त भारत' या पंतप्रधानांच्या संकल्पनेला सहकार्य करावे, असे आवाहनही अतुल काळसेकर यांनी यावेळी केले. (वार्ताहर)जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक लाभार्थी !प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ९४५ नागरिकांना होणार आहे. या सर्व नागरिकांची कुटुंबे सन 2011च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, त्या कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. सावंतवाडी तालुक्यात २९ हजार १२६, सावंतवाडी शहरात २२५४, वेंगुर्ले तालुक्यात २४ हजार ४४२, वेंगुर्ले शहरात १०३०, दोडामार्ग तालुक्यात १५ हजार १८३ असे लाभार्थी असल्याचे अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.या योजनेंतर्गत देवगड तालुक्यात १८ हजार ४३०, कणकवली तालुक्यात ३० हजार ३७ , कणकवली शहरात ७७०, वैभववाडी तालुक्यात १२ हजार ८११, कुडाळ तालुक्यात ४५ हजार ८८६, मालवण तालुक्यात २९ हजार ६७४, मालवण शहरात ३३०२.
फक्त आश्वासने न देता भाजपकडून विकास
By admin | Published: July 01, 2016 9:02 PM