मुंबई - अमरावती : अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार राणा आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. आता, धर्मपरिवर्तनावरुन आमदार नितेश राणे यांनीही भाष्य केलं आहे. सध्या धर्मपरिवर्तनाचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, याप्रकरणात पोलिसांची मदत होत असल्यास संबंधित पोलिसांवर कारवाईचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार राणे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लग्नाच्या निमित्ताने खोटी स्वप्न दाखवून धर्मपरिवर्तन करायला प्रवृत्त करणं हा प्रकार मोठया प्रमाणावर सुरू आहे. नगर, अमरावती, कोल्हापूरमध्ये अश्या घटना घडत आहेत. अश्या पध्दतीच्या घटना बंद करण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. या घटनांमध्ये पोलिसांची मुख संमती असते. त्यामुळेच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची वेळोवेळी माहिती दिलेली आहे. फडणवीसांनी पोलिस यंत्रणेला धर्मपरिवर्तनाच्या कोणत्याही विषयामध्ये पोलिसांची मदत होत असेल तर त्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती आमदार राणे यांनी दिली.
धर्मपरिवर्तनाच्या घटना बंद करण्यासाठी लवकरात लवकर कायदा आणत आहोत. धर्मपरिवर्तनाला जे लोक समर्थन करत असतील, त्यांना कडक शिक्षा देण्याची भूमिका महाराष्ट्र यापुढे घेईल, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.
अमरावतीतील घटनेननं मुद्दा ऐरणीवर
अमरावतीत एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावं. या प्रकरणी तपासाला इतका उशीर का लागतोय, असा सवाल करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.