देवगड : श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मार्च रोजी होणारा महाशिवरात्रौत्सव हा गावपातळीवर होणार असून कोणीही नागरिक, पर्यटक, अथवा भाविकांना कुणकेश्वर यात्रेत बंदी असेल, असा निर्णय जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आज देवस्थान कमिटी व प्रशासन यांनी घेतला.
शिवभक्तांची मांदियाळी ठरलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रोत्सव ११ मार्च रोजी आहे. कुणकेश्वरचा यात्रोत्सव तळकोकणात होणाऱ्या प्रमुख उत्सवांमधील महत्त्वाचा यात्रोत्सव मानला जातो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रतील व लगतच्या कर्नाटक व इतर राज्यांतील भाविकही मोठ्या प्रमाणावर येथे उपस्थिती लावतात.यावर्षी यात्रोत्सव ११ मार्च रोजी असल्याने तसेच अमावस्या संपूर्ण दिवसभर असल्याने पवित्र स्नानासाठी देवस्वाऱ्या, भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. यादृष्टीने देवस्थान कमिटी व प्रशासन यांनी नियोजन केले आहे. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे खबरदारी महत्वाची असल्याने श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मार्च रोजी होणारा महाशिवरात्रौत्सव हा गावपातळीवर होणार आहे.