'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज', कणकवलीत आमदार नितेश राणेंनी गाड्यांवर चिकटवले स्टिकर
By सुधीर राणे | Published: January 7, 2023 04:26 PM2023-01-07T16:26:19+5:302023-01-07T16:27:41+5:30
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या 'त्या' विधानावरुन आता स्टीकर वॉर सुरू
कणकवली : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. तर स्वराज्य रक्षक होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपने अजितदादांचा निषेध नोंदवत आंदोलने केली. मात्र, तरी देखील अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यानंतर भाजपच्यावतीने ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’या आशयाचे स्टीकर गाड्यावर लावून निषेध नोंदविला जात आहे. यामुळे आता स्टीकर वॉर सुरू झाले आहे.
आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' अशा आशयाचे स्टिकर चारचाकी गाड्या आणि दुचाकीवर लावून आज, शनिवारी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ..! , जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणांनी उपस्थितांनी आसमंत दुमदुमून सोडला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर चिकटवलेल्या दुचाकींची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. यात आमदार नितेश राणे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री, संतोष कानडे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साटम, मनोज रावराणे, दिलीप तळेकर, पप्पू पुजारे, सरपंच संदीप मेस्त्री, महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दंम, गणेश तळगावकर, मिलिंद चिंदरकर, विश्वनाथ जाधव, शिवा राणे, गोविंद घाडी, अभय गावकर, आदी भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.