ओरोस : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी प्रथमेश सुधाकर ढोलये (रा. धुरीवाडा, सागरी महामार्गानजिक, मालवण) याचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा विशेष न्यायाधीश आर.बी.रोटे यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील एका रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर आरोपी भूषण शरद माडये ( रा.वायरीबांध, तारकर्ली मालवण ) याने लैंगिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी प्रथमेश ढोलये याने पीडित मुलीला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तर तिसरा आरोपी केशव ध्रुवबाळ फोंडवा ( रा. सर्जेकोट जेटीनजीक, मालवण ) याने पीडित मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केला होता.
ही घटना १२ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक एस.बी.गावडे यांनी केला होता. या गुन्ह्यातील तीनही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत.या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश ढोलये याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी प्रथमेश ढोलये याच्या जामीन अर्जावर हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी घडलेला गुन्हा गंभीर असून आरोपी प्रथमेश ढोलये याने पीडितेला मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून गंभीर कृत्य केले आहे. आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तक्रारदार आणि साक्षीदार यांच्यावर दबाव आणून त्यांना प्रलोभन देण्याची शक्यता आहे.पीडित मुलीला धमकावून गुन्ह्याची सत्य हकीकत न्यायालयात सांगण्यापासून परावृत्त करण्याची शक्यता आहे. पीडित मुलीबाबत असा गुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जामीन मिळाल्यास जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आरोपी न्यायालयात हजर राहील याची शाश्वती नाह. हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आरोपी प्रथमेश ढोलये याचा जामीन अर्ज फेटाळला.