सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुमच्या वडिलांवर “स्मगलर” म्हणून गंभीर आरोप केला तो तुम्ही राजकारणासाठी विसरू शकता पण येथील जनता विसरलेली नाही. याचा हिशेब जनता चुकता करेलच पण राजकारणासाठी तुम्ही वडिलांवरील खालच्या पातळीवरील टीका विसरता आणि राणेंचे गोडवे गाता हे तुम्हाला कसे जमत अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकर यांच्यावर केली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, अशोक धुरी, सुनिल गावडे, बाळु माळकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक कोटी पक्षाला दिल्याचे सांगता मग शिवसेनेच्या कार्यक्रमांना पैसे का देत नव्हता असा सवाल ही त्यांनी केला.राऊळ म्हणाले, शिवसेनेने मंत्रीपदासाठी एक कोटी तुमच्याकडे मागितले. मग तुम्ही त्याचवेळी आमदारकीचा राजीनामा देवून बाहेर का पडला नाही? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. नाहक खोटे बोलून त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, ते खोेटारडे आहेत. आपण हा प्रकल्प आणला तो प्रकल्प आणला असे सांगुन त्यांनी नेहमी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना आता जनता ओळखू लागली आहे. त्यांनी आणलेले प्रकल्प, कारखाने, पर्यटन प्रकल्प, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नेमके काय झाले? याचे उत्तर आता त्यांना जनतेला द्यावेच लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.राऊळ पुढे म्हणाले, या ठिकाणी राजकीय फायद्यासाठी मंत्री केसरकर कुठल्याही थराला जावू शकतात. ज्या राणेंनी यांच्या वडिलांना स्मगलर म्हटले आणि अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिका केली त्यांच्याच पाया पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शिवसेनेत असताना राणेंना कंटाळून आपण या ठिकाणी आलो असे सांगणारे केसरकर आता मात्र त्यांचे गुणगान गात आहेत. मात्र त्यांनी कितीही रुपे बदलण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणची जनता सर्व काही ओळखून आहे. आणि त्यांना ती कदापिही माफ करणार नाही.
महासंस्कृती महोत्सव म्हणजे उधळपट्टी राऊळ यांनी सावंतवाडीत सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवावर टिका केली. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन पैशाची उधळपट्टी या ठिकाणी केली जात आहे. त्यात शंभर सुध्दा प्रेक्षक उपस्थित नव्हते. मात्र शिवसेनेच्या संवाद सभेला मोठी गर्दी होत आहे. याचा अर्थ आता मंत्री केसरकरांचा जनाधार संपला आहे, असा चिमटा त्यांनी काढला.