सावंतवाडी : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नगरपरिषद प्रशासनाकडून परवानगी न घेता सावंतवाडी शहरात एका खासगी मोबाईल कंपनीकडून केबल घालण्याचे काम सुरू आहे. आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी १५ तारखेपर्यंत काम करण्याची परवागनी दिली आहे, असे सांगून टोलवाटोलवी करीत दिवसरात्र हे काम सुरु आहे.
दरम्यान चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटल्याचे दिसून येत आहे तसेच रस्त्यावर खड्डे पडणार असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही दिसत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक चांगले संतापले असून अशी कामे पावसाळ्यात नकोच अशी मागणी करण्यात येत आहे.
रस्त्याच्या बाजूला बोरिंग मुळे रस्ते खराब होवून अपघात होण्याची शक्यता आहे. अशातच बांधकाम अधिकार्यांच्या परवानगीने सावंतवाडी शहरात खोदाई सुरू आहे.याला नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नाही असे असतना दिवस रात्र भरपावसात हे काम सुरू असून या विरोधात स्थानिक माजी नगरसेवक विलास जाधव आक्रमक झाले आहेत.
या विरोधात आवाज उठवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एका खासगी मोबाईल कंपनीची केबल घालण्याचे काम शहरात सुरू आहे. आधुनिक मशीनच्या सहाय्याने रस्ते न खोदता बोरिंग करुन केबल टाकणार असल्याचा दावा संबधितांकडून करण्यात आला आहे. परंतू ज्या ठिकाणावरुन खोदाई करण्यास सुरवात केली जाते त्या ठिकाणी मोठा खड्डे पडले आहेत. रात्री येथील कारागृह परिसरात हे काम सुरू होते. त्या ठिकाणी महामार्गावरून येणार्या वाहनांना समजेल यासाठी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने जाधव यांनी हे काम थांबविण्याच्या त्यांना सुचना केल्या, परंतू आम्हाला हे काम लवकरात लवकर पुर्ण करायचे आहे. असे सांगून त्यांनी काम करण्यास सुरवात केली.
यावेळी जाधव यांनी आक्रमक भूमिका घेवून पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुखें यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिका प्रशासनाकडुन अशा प्रकारे रस्ते खणण्याची कोणालाच परवानगी देण्यात आली नाही, असे सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांनी कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.