कणकवली : शिक्षणाने नवी पिढी जेवढी समृद्ध होईल तेवढी विकासाची गती वाढत जाईल. त्यासाठी शैक्षणिक विकासात डिजिटल तंत्राचा प्रवेश महत्त्वाचा आहे. हरकुळ खुर्द गावात सुरू झालेली डिजिटल शाळा आदर्शवत ठरेल. शिक्षणातून विकास गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. हरकुळ खुुर्द गावडेवाडी शाळेचा लोकार्पण सोहळा आणि डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी तालुक्यातील हरकुळ खुर्द-गावडेवाडी प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पं.स. सभापती आस्था सर्पे, उपसभापती भिवा वर्देकर, पं.स. सदस्य अनुष्का रासम, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, हरकुळचे सरपंच सुभाष दळवी, उपसरपंच संदीप रासम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संजय रावले, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रकाश दळवी, मंगेश सावंत, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी डिजिटल शाळेचेही आमदार राणे यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, शिक्षणाचे डिजिटलायझेशन ही आजच्या काळाची गरज आहे. ही संकल्पना सर्वत्र पोहोचायला हवी. इंटरनेटच्या जमान्यात त्या दर्जाची सुविधा गावागावात पोहोचायला हवी. गावातील पिढी घडविण्यासाठी शाळा महत्त्वाची आहे. सतीश सावंत म्हणाले, डिजिटल शाळेची संकल्पना ग्रामस्थांच्या सहकार्याने अंमलात येऊ शकली. माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या शिफारसीमुळे शाळेला निधी मिळू शकला. इमारत बांधणारे संजय पडवळ यांना सावंत यांनी आदरांजली व्यक्त केली. उपसभापती बाबा वर्देकर, ज्येष्ठ साहित्यिक ल. ना. केरकर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी हरिश्चंद्र रावले यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील ठाकूर यांनी, तर आभार महेंद्र डिचवलकर यांनी मानले. यावेळी शशिकांत ठाकूर, वसंत वालावलकर, दत्तात्रय हुले, रामचंद्र रावले, ल. ना. केरकर, रचना पाटील, सदाशिव राणे, हरिश्चंद्र रावले, सुशीला शेळके, विश्वनाथ आपटे, मुख्याध्यापक सुनिल ठाकूर, प्रणाली रासम, केंद्रप्रमुख विनोदिनी रासम या आजी-माजी शिक्षकांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार केला. शाळेला जमीन दान करणारे दयानंद पाटकर यांचाही विशेष गौरव केला. गावाच्यावतीने तुळशीदास रावराणे यांचाही आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
शैक्षणिक विकासात डिजिटलायझेशन महत्त्वाचे
By admin | Published: October 27, 2015 10:13 PM