आंबोली ,दि. ०४ : आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दत्तक घेतलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी चौकुळ गावातील प्रत्येक कुटुंबास रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेवळी गावातील विकासकामांची चर्चा करण्यात आली. गावातील लोकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणा-या योजना तसेच त्या कशा पध्दतीने राबवाव्यात याविषयी केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यामध्ये गावातील दुग्धोउत्पादन वाढविण्यासाठी चराऊ कुरण योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. यासाठी सरकारी जमिनीवर एकत्र पध्दतीचा गोठा बांधणे व कुंपन घातलेले चराऊ कुरण तयार करणे. पथदर्शी स्तरावर यामध्ये १00 लाभार्थी असणार आहेत.
तसेच कुकुटपालन उद्योगाविषयी गावक-यांना मार्गदर्शन केले. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी गावातून स्वयंसेवक तयार करण्याचेही सांगण्यात आले. त्याविषयी गावात शेळीपालन, मत्स्यपालन, मधुमक्षीका पालन या सारख्या योजना राबवून प्रत्येक हाताला काम मिळून देण्याचे नियोजन करण्याविषयी चर्चा झाली.
फळबाग लागवड व भाजीपाल्यांचे उत्पादन घेणे. काजू, पेरु, लिंबू यांच्या फळबागा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. तर भाजीपाला उत्पादनाच्या योजनेसाठी पथदर्शी स्तरावर २00 लाभार्थी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व योजना योग्यरित्या राबविण्यासाठी गेळे, कुंभवडे, आंबोली व चौकुळ यांचा एक क्लस्टर तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच या क्लस्टरमध्ये काजू प्रक्रिया उद्योग रेशीम उद्योगही प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले.
पर्यटनवाढीसाठी युवकांना मिनीबस पुरविणारपालकमंत्री म्हणाले, गावाचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यासाठी व्यवसाय व रोजगार वाढला पाहिजे. त्यामुळे समृध्दी येईल. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय चौकुळ गावात पर्यटन वाढीसाठी तेथील युवकांना मिनी बस पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.
या योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. गावाचा योजनामधील सहभाग महत्वाचा आहे असेही ते म्हणाले. तसेच यंत्रणांनी कामे लवकरात लवकर पुर्ण करावी असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले. या सभेला तालुका व जिल्ह्यातील वन, कृषी, आरोग्य, शिक्षण विभागातील अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.