चिपळूण : ग्यानबा तुकाराम... ग्यानबा तुकाराम..., ज्ञानोबा माऊली तुकाराम... असे अभंग गात टाळ मृदुंगाच्या गजरात कोकण दिंडी समाज संस्थेची पालखी आज (मंगळवारी) श्री क्षेत्र परशुराम येथून पंढरपूरकडे निघाली आहे. कोकण दिंडी समाज संस्थेतर्फे गेली १६६ वर्षे ही परंपरा जपली जात आहे. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरलेले भक्त पंढरीकडे सुतासारखे चालत असतात. दरवर्षी माघी एकादशीला ही वारकरी मंडळी पांडुरंगाच्या चरणावर लीन होते. पांडुरंगाचे चरण स्पर्श होताच ते आपले दु:ख विसरतात. ह. भ. प. वै. अन्याबा राजेशिर्के (वेहेळे) यांनी १८५६ मध्ये कोकण दिंडी समाजाची स्थापना केली. त्यानंतर कोकण दिंडी समाज ऊर्फ भार्गवराव दिंडी पालखी सोहळा या नावाने श्री क्षेत्र परशुराम ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंंडी सुरु झाली. दिंडी मालक प्रतापराव राजेशिर्के यांनी ही पायी दिंडी पुढे चालविली. आता ह. भ. प. रुपेश महाराज राजेशिर्के या तरुणावर या दिंडीची जबाबदारी आहे. १६६ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी मोठ्या दिमाखात भालदार, चोपदारांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडीत अनेक वयोवृद्ध, तरुण तसेच महिलांचाही समावेश आहे. आज सकाळी परशुरामहून दिंंडी पेठमाप येथे आली असता पेठमाप परीटआळी विठ्ठल मंदिरात अध्यक्ष मनोज शिंदे, माजी अध्यक्ष दीपक कदम, दशरथ पावसकर, पांडुरंग सातारकर, संजय कदम, वैभव कदम, अरुण कदम, गजानन कदम, मनोहर कदम आदी अनेकांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर स्वकुळ साळी समाज विठ्ठल मंदिरात पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून ही पालखी पुढे प्रवासासाठी मार्गस्थ झाली. परशुराम येथून निघालेल्या दिंडीला शेकडो भक्तांनी निरोप दिला आणि ग्यानबा तुकारामच्या गजरात पंढरपूरकडे निघाली असून, माघ वारीचा हा आनंद व परंपरा डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी आज गर्दी केली होती. पेठमाप परीटआळी विठ्ठल मंदिरात दिंडीसमवेतच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
दिंडी चालली, विठुरायाच्या दर्शनाला
By admin | Published: January 20, 2015 10:14 PM