सावंतवाडी : येथील मिलाग्रीसच्या मराठी प्रायमरी स्कूलचे शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द करा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर पूर्णविराम मिळाला असून सिंधुदुर्ग डायोसिझन एज्युकेशन ट्रस्टने दिनेश खोत यांच्यासह अन्य दोन शिक्षकांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. याबाबतची घोषणा बिशप आॅल्वीन बरेटो यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यामुळे गेले आठ दिवस बदलीवरून उठवलेले वादळ आता शांत होणार असून पालक शाळा बंद आंदोलनही मागे घेणार आहेत.मिलाग्रीसच्या मराठी प्रायमरी स्कूलचे शिक्षक दिनेश खोत यांच्या बदलीवरून १५ जूनपासून सावंतवाडीत पालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. तर मंगळवार २१ जूनपासून पालक उपोषण करणार होते. मात्र तत्पूर्वीच प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आपल्या दालनात पालक व संस्थेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली व संस्थेने खोत यांची बदली रद्द करावी, अशी विनंती केली होती. तसेच पालकांना उपोषण तीन दिवस पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यामुळे पालकांनी प्रांताधिकारी यांच्या आश्वासनामुळे उपोषण पुढे ढकलले होते. बुधवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली बिशप आॅल्वीन बरेटो यांना भेटले होते. त्यांनीही योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.त्यानंतर गुरूवारी संस्थेने सिंधुुदुर्ग डायोसिझन एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने एक प्रसिद्धीपत्रक काढले. यात शिक्षक दिनेश खोत, रोशन बार्देस्कर आणि सॅड्रा फर्नांडिस या तिघांच्या बदलीला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे. हे शिक्षक खोत यांच्या बदलीवर मालवण येथून सावंतवाडीत येणार होते. तर सॅड्रा फर्नांडिस यांची मालवण येथून देवबाग येथे बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा. तसेच शिक्षकांच्या प्रामाणिक सेवेचा लाभ जिल्ह्यातील इतर ठिकाणी व्हावा, या उद्देशाने नियमाचे पालन करून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र संस्थेच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतले. विविध स्तरांतून लोकांनी संस्थेला विनंती केली. संस्थेने शासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले त्यानंतरच या निर्णयाला स्थगिती देत असल्याचे बिशप आॅल्वीन बरेटो यांनी जाहीर केले. दरम्यान संस्थेने शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द केल्याने आता आंदोलनालाही पूर्णविराम मिळणार असून पालकही आपली मुले शुक्रवारपासून शाळेत पाठविणार आहेत. याबाबतचा अधिकृत निर्णय पालकांनी अद्याप जाहीर केला नसला तरी आमची मागणी शिक्षक खोत यांची बदली रद्द व्हावी ही होती आणि त्या बदलीला स्थगिती मिळाल्याने आम्हाला मुले शाळेत पाठवण्यास काहीच हरकत नाही, असे काही पालकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘लोकमत’ ने मांडलेल्या पालकांच्या भावनासबुरीचा सल्ला कामी : पालक, नागरिकांकडून झाले अभिनंदन, संस्थेच्या निर्णयाचेही कौतुकसावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलचे शिक्षक दिनेश खोत यांच्या बदलीप्रश्नी उद्भवलेला वाद बदलीला स्थगिती दिल्यानंतर अखेर शांत झाला. बदलीविरोधात पालकांनी केलेल्या आंदोलनामुळे सर्वपक्षीयांचे लक्ष वेधले गेले होते. या सर्व प्रकरणाचा ‘लोकमत’ने गेले सात दिवस सतत पाठपुरावा केला. जनमत कायम ठेवत संस्थेला दिलेला ‘सबुरीचा’ संदेश कामी आला आहे. शिक्षकांची बदली रद्द होण्यासाठी पालकांच्या भूमिकेला पाठींबा समाजातील विधायक पद्धतीची पाठराखण केल्याबद्दल ‘लोकमत’चे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. मिलाग्रीस ही सावंतवाडीच्या शैक्षणिक शेत्रातील महत्वपूर्ण प्रशाला मानली जाते. या शाळेत गेली ३0 वर्षे कार्यरत असणारे दिनेश खोत यांची प्रशासनाने शाळेच्या सुरूवातीला बदली केली. खोत यांनी आपल्या शिक्षणपद्धतीने मुलांसह पालकांमध्ये शाळेविषयी आत्मियता निर्माण केली होती. त्यामुळे पालकांना खोत यांची बदली मानवली नाही, आणि आंदोलनाचा इशारा दिला. पण संस्थेने हे आंदोलन गांभिर्याने घेतले नाही आणि पालकांनी तीव्र होत शाळा बंद, धरणे आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला. शिवाय पालकांसह विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने शहरातील सर्वपक्षीयांनीही यामध्ये आपल्यापरीने सहभाग दर्शविला. शाळेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे १५ जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करत जनमताची तीव्रता संस्थेच्या निदर्शनास आणून दिली. पण संस्था प्रशासकीय बदलीच्या नावाने काही निर्णय घेण्यास धजत नव्हती. या दरम्यान, ‘लोकमत’ने रविवारच्या बेधडक या सदरामध्ये १९ जून रोजी ‘जनप्रक्षोभ ओळखून सबुरीने घ्या’, असे सविस्तर विवेचन करत संस्थेचा इतिहास, कर्तृत्व आणि सद्यस्थिती याबद्दल जागृती केली होती. परिणामी सावंतवाडीसह संस्थेच्या शाखा असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणांतून या सदराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. पालकांनीही प्रत्यक्ष भेटून आणि भ्रमणध्वनीवरून धन्यवाद मानले. संस्थेनेही या सदराची दखल घेत पालकांना थोडा वेळ प्रतिक्षा करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, शहरातील प्रमुख पक्षाच्या मान्यवरांनी संस्थाचालकांना भेटून बदली प्रकरणावरून वाद न चिघळण्याचे आवाहन केले होते. यामध्ये विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजपाचे राजन तेली, काँग्रेसचे संजू परब, जयेंद्र परूळेकर यांचा सहभाग होता. तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही दूरध्वनीवरून संस्थेने पालकांच्या आंदोलनाची व विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दखल घेत योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती. या सर्व प्रकरणाचा ‘लोकमत’ने सतत आठ दिवस पाठपुरावा केला होता. संस्थेने गुरूवारी ही बदली रद्द करण्याचा निर्णय घेत जनमताचा आदर केला. यामुळे पालकांनी बैठक घेऊन संस्थेच्या निर्णयाचे व लोकमतच्या पाठपुराव्याचे अभिनंदन केले. तसेच या निर्णयामुळे मिलाग्रीसबाबत उसळलेला आगडोंबही शांत झाला आहे. (प्रतिनिधी)
दिनेश खोत यांच्या बदलीला स्थगिती
By admin | Published: June 23, 2016 11:59 PM