सुधीर राणे
कणकवली : मनमोहक पणत्या, तोरण, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दिपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर अनेक बंधने आहेत .सर्वात मोठा सण असलेल्या दीपोत्सव पर्वास सुरुवात झाली असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रंगीबेरंगी प्रकाशात उजळून निघाला आहे. धनत्रयोदशी, नरकचर्तुदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दीपावलीतील एकेक सण दररोज साजरे करण्यासाठी घरोघरी तयारीही पूर्ण झाली आहे. तर अनेक ठिकाणी बच्चे कंपनी किल्ला बनविण्यात गर्क झाली असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे.या उत्सवाचे वेध महिनाभर अगोदरपासूनच लागलेले असतात. फराळ, कपडे, धार्मिक विधी अशा अनेक कामांची घाई झालेली असते. त्यासाठी विविध प्रकारची खरेदी केली जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे ग्राहकाना खरेदी करताना हात आखड़ता घ्यावा लागत आहे.सर्व बाजारपेठा दीवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. गृहोपयोगी वस्तू, कपडे, फळे, फुले अशी विविध प्रकारची खरेदी सहकुटुंब केली जात असल्याचे सध्या दिसत आहे.नरकचतुर्दशी शनिवारी साजरी करण्यात आली. सुर्योदयापूर्वी अनेक ठिकाणी नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच एकमेकांना फराळाचे निमंत्रण देवून करंज्या, लाडू, चकली , चिवड़ा अशा फरळाचा आस्वाद घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अनेकांकडून काळजी घेण्यात येत होती.शनिवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यासाठी शुक्रवारीच तयारी करण्यात आली होती. तसेच अनेक नागरिकांनी दीवाळी पाडवा आणि भाऊबीजसाठी मोठया प्रमाणात खरेदी केली . दीपोत्सवानिमित्त घरोघरी दीप उजळले आहेत. विद्युत माळांमुळे रोषणाईत भर पडली आहे. वर्षभरातील थकवा दूर सारून आता सारे जणच दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी भात कापणीची लगबग सुरु आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांना मर्यादा !दीपोत्सवानिमित अनेक संस्था व मंडळे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात .मात्र, यावर्षी कोरोना मुळे या सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत.