दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तिलारी मुख्य धरणाचे पाणी पुच्छ कालव्यादवारे उद्यापासून तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली आहे.त्यामुळे तिलारी पाटबंधारे विभागाने मुख्य धरणातील पाणी खळगग्यातील धरणाच्या पुच्छ कालव्यादवारे तिलारी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तिलारी शीर्षकामे उपविभाग क्र.२ चे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.त्यांनी जाहीर निवेदनात म्हटले आहे,शनिवार (दि.२०) पासून तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या आरओएस व जीओएस नुसार धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने ‘पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने शनिवारपासून खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्यस्थितीत धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र, खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात येवून नदीपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतक-यांना इशारा देण्यात येतो की, २२ जुलैपासून पुढील कालावधीमध्ये नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकत असल्याने जीवित व वित्तहानी टाळणेसाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदी पात्रातून ये-जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणा-या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी.
नदीकाठच्या व इतर सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा गाव पातळी वरुन गावात दवंडी देवून देण्यात याव्या व जलसंपदा विभागास सहकार्य करावे असेही त्यांनी कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे,खानवाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली -भेडशी (ता. दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग.) इब्रामपूर – हणखणे,चांदेल हसापूर, कासारवर्णे, वारखंड (ता. पेडणे जि. उत्तर गोवा.) आदी गावच्या सरपंच,पोलिस पाटील व तलाठी यांना आवाहन केले आहे.