आंबोली : भारतातील पश्चिम घाटातील आंबोलीची सरपटणारे व उभयचर प्राण्यांसाठी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आंबोलीमध्ये तब्बल ४१ प्रकारचे विषारी व बिनविषारी साप, २६ प्रकारचे बेडूक व नऊ प्रकारच्या पाली सापडतात. याच पालीमध्ये आणखी एका पालीची भर पडली आहे. या पालीला हेमिडॅक्टीलस वरद गिरी असे नाव संशोधक विद्यार्थ्यांनी दिले आहे.
जगासाठी नवीन असणाऱ्या पाली सामान्यपणे आंबोलीतील सर्व घरांमध्ये घरांच्या भिंतीवर तसेच जंगलातील झाडांच्या खोडांवर दिसून येतात. या पालीला स्थानिक नाव नाही, परंतु या पालीला संशोधक ब्रुक्स गेक्को असे म्हणून ओळखत असत. प्रत्यक्षात मात्र या पालीवर संशोधन झाले नव्हते किंवा ही पाल शास्त्रीयदृष्ट्या कोणती आहे, हे सिद्ध झाले नव्हते.
परंतु, २०१८ पासून डॉ. वरद गिरी व त्यांचे विद्यार्थी सहकारी विशाल अग्रवाल, अपर्णा लाजमी, अक्षय खांडेकर, आर. चैतन्य हे अभ्यास करत होते. दोन वर्षे सातत्याने या पालीवर संशोधन केल्यानंतर ही पाल वेगळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानुसार त्यांनी या पालीचे नामकरण केले आहे. याबाबत शास्त्रीय दृष्टीकोनातून बनविलेला अहवाल त्यांनी झुटास्का या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधपत्रिकेत प्रसिद्ध केला आहे.या नवीन पालीच्या संशोधनामुळे आंबोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.आंबोलीत यापूर्वीही अशा प्रकारे अनेक संशोधने झाली आहेत. या पालीला हेमिडॅक्टीलस वरद गिरी असे नाव त्याच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दिली आहे.