तळवडे : झपाट्याने विकसित होत चाललेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समृध्द आणि प्रगतशील असावी, या उद्देशाने व्हिजन सिंधुदुर्ग संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेच्या पदाधिकारी वर्गाची जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व मंत्री यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात या संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली.यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला आमचा सदैव पाठिंबा आहे. या व्हिजन सिंधुदुर्ग संस्थेने जिल्हा विकासाला चालना देणारे उपक्रम राबवावेत. यात आपण सदैव सहकार्य करू, असे राऊत म्हणाले. यावेळी व्हिजन सिंधुदुर्गचे प्रमुख मार्गदर्शक अनंत भालेकर, सचिव अशोक करंगुटकर, उपसचिव संजय परब, संपर्कमंत्री संदीप नाईक, मोहन नाईक, डी. डी. पेडणेकर आदी उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक अनंत भालेकर यांनी या संस्थेचे कार्य स्पष्ट केले आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे संस्थेच्या कामकाजाचा विषय मांडण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग आॅरगॅनिक फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर उपस्थित होते.व्हिजन सिंंधुुदुर्ग संस्था ही कृषी उद्योग पर्यटन विकासातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही संस्था निष्पक्ष असून, मुंबई व कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती एकत्र येऊन हा उपक्रम राबवित आहेत. या संस्थेमार्फत कृषी पर्यटन फलोद्यान, मत्स्योद्योग, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, हॉलिवूड, बॉलिवूड पर्यटन (चित्रपट सृष्टी), आयुर्वेदिक उत्पादने निसर्गोपचार, कलाविष्कार, हॉटेल रिसॉर्ट, फळप्रक्रिया, सर्व सुखसंपन्न गृहप्रकल्प, शाळा, कॉलेज, आरोग्य, सुविधा केंद्र, पशुपालन, दुग्धव्यवसाय, सागर पर्यटन, साहसी पर्यटन, आय.टी. सेक्टर अशा विविध सामाजिक आणि व्यावसायिक उपक्रमांना सुस्थितीत ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्याचे नावीन्यपूर्ण नियोजन या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरीवर्ग, सर्वसामान्यांना एकत्र आणून जिल्ह्याचा विकास साधण्याचे त्याचे ध्येय आहे. (प्रतिनिधी)
‘व्हिजन सिंधुदुर्ग’ची राऊत यांच्याशी चर्चा
By admin | Published: September 16, 2016 9:31 PM