संगीत राज्यनाट्य स्पर्धेतील ‘सं. सौभद्र’ हे सादर झालेले दुसरे नाटक १७ जानेवारी २०१५ रोजी अष्टगंध, गोवा या संस्थेने सादर केले. गोव्याच्या संस्थेकडून रसिकांच्या खूपच अपेक्षा होत्या, परंतु नाटक अपेक्षितरित्या सादर न केल्यामुळे रसिकांचा भ्रमनिरास झाला. स्पर्धेसाठी सायकांळी ७ ते ११ ही वेळ दिलेली आहे. त्यामुळे मध्यंतरासहित नाटक ४ तासांत सादर करावे लागते. परंतु, या नाटकाचा दुसरा अंक खूपच लांबला. त्यामुळे तिसरा अंग अक्षरश: गुंडाळावा लागला. तिसऱ्या अंकात कोणतेही संवाद व कोणती पदे गाळावी, याचे नियोजन दिसले नाही. त्यामुळे नाटकाचा शेवट कसा झाला व काय झाला, हेच कळले नाही. तिसरा अंक बऱ्याच रसिकांच्या डोक्यावरुन गेला. ज्यांना या नाटकाचे कथानक माहित होते, त्यांनी ते समजून घेतले, पण ज्यांना कथानक माहित नव्हते, त्यांच्या नाटक संपल्याचे लक्षातही आले नाही. गोवा म्हणजे संगीताचे माहेरघर. त्यामुळे या नाटकातील पदे दमदारपणे सादर करण्यात आली. पदांना रसिकांनी चांगली दाद दिली. परंतु शब्दोच्चार चुकीचे होत असल्यामुळे पदांमधील गंमत कमी झाली. सिध्दी शेलार (सुभद्रा) यांची गंधर्व ताल सांभाळताना कसरत होत होती. तसेच पदे गाताना त्या अनावश्यक ताकद लावत होत्या. नाट्यपदे सादर करताना, गाण्याच्या स्वराचा विचार करुन, आवश्यक त्या स्वरात संवाद सादर करावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वरात गाणे उचलणे सोपे जाते. परंतु सौत्र सिध्दी शेलार संवाद म्हणताना खूप खालच्या स्वरात बोलत होत्या व नाट्यपद गाताना खूप वरच्या स्वरात गात होत्या. त्यामुळे गाण्याचा स्वर व बोलण्याचा स्वर यामध्ये बरीच तफावत जाणवली. श्रीकृष्ण कसा दिसायला हवा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे, या नाटकातील विठ्ठल गावस यांनी उभा केलेला देखणा श्रीकृष्ण. त्यांचे सुंदर, मोहक रुप पाहून, खरा श्रीकृष्ण अवतरल्याचा भास होत होता. श्री. विठ्ठल गवस (श्रीकृष्ण) यांनी आपली नाट्यपदे समर्थपणे पेलली. काही ठिकाणी आॅर्गन, तबला व गायक यांच्यातील तोल ढासळत होता संजय धूपकर (नारद) यांनी आपली गायकी दाखवून दिली. ‘राधाधर मधुमिलींद’ व ‘पावना वामना यामना’ ही पदे समर्थ गायकीने एक उंचीवर नेऊन ठेवली. तबलावादक दत्तराज शेट्ये व आॅर्गन वादक दत्तराज सुर्लकर यांनी स्वत:चे कसब दाखविले. दत्तराज शेट्ये यांनी जादुई तबला वादन केले. रसिकांनी त्यांना अनेकवेळा दाद देऊन त्यांची स्तूती केली. सिध्दी शेलार (सुभद्रा) यांनाह गंधर्व ताल भरुन वाजविल्यामुळे आता आपले काय होणार? या विचाराने ‘बलसागर तुम्ही’ हे विरहगीत सादर करताना हसू आले. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य कमी झाले. ‘अरसिक किती’ हा शेला व ‘किती सांगू तुला’ ही पदे अजून नाट्यपूर्ण सादर व्हायला हवी होती. अर्जूनाची भूमिका साकारणारे कृष्णा कोटकर हे संवाद इतके भराभर म्हणत होते की, ते काय बोलत होते, ते कळतच नव्हते. नाटकातील जवळजवळ सर्वच पात्रांचे पाठांतर चांगले झाले नसल्यामुळे बऱ्याचदा संवाद विसरणे, शब्द अडखळणे, दोन वाक्यात जरुरीपेक्षा जास्त गॅप असे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे नाटकाचा तोल ढासळत गेला. नाटकाचे पार्श्वसंगीत खूपच लाऊड व सीनेमॅटीक होते. त्यामुळे पौराणिक कथेला ते विसंगत वाटले. नैपथ्य मात्र खूपच सुंदर होते. रशीला पळ यांनी रुक्मिणीची भूमिका साकार करताना अचकट- विचकट हावभाव प्रकट केले. नणंद या अर्थाचा वन्सं हा शब्द त्या वन्स असा उच्चारीत होत्या. अशुध्द शब्दोच्चार, भूमिकांचा न केलेला अभ्यास, पाठांतराकडे केलेले दुर्लक्ष, सर्वच पदे गाण्याचा अट्टाहास, गुंडाळावे लागलेले कथानक यामुळे नाटक गावातील उत्सवातील नाटकाच्या दर्जाचे झाले.
‘सौभद्र’ने केला रसिकांचा भ्रमनिरास
By admin | Published: January 18, 2015 11:13 PM