मालवण : तालुक्यातील देवबाग, दांडी येथील वॉटरस्पोटस व्यावसायिकांनी येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांमधील वाद विकोपाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मेरीटाईम बोर्डाच्यावतीने देवबागमधील वॉटरस्पोर्टसबाबत निर्माण झालेल्या समस्येबाबत २१ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बंदर कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मेरीटाईम बोर्ड कोणता निर्णय घेते याकडे वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.देवबाग येथील वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांमध्ये त्सुनामी आयलंड येथे व्यवसाय करण्यावरून वाद निर्माण झाले आहेत. याप्रकरणी देवानंद चिंदरकर यांनी मनोज खोबरेकर, राजन कुमठेकर, पंकज धुरी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.
यात राजन कुमठेकर यांनीही देवानंद चिंदरकर यांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिली. तर दांडी येथील सागर धुरी यांनी समीर सारंग, मनोज खोबरेकर, पंकज धुरी यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार संबंधितांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी वॉटरस्पोर्टस व्यवसायात सुसूत्रता यावी यासाठी सर्व व्यावसायिकांनी एकत्रित यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी वॉटरस्पोर्टस व्यावसायिक एकत्र आले नव्हते. मात्र पर्यटकांची सुरक्षितता, वाढती स्पर्धा, होणारे अपघात टाळावेत यासाठी देवबागमधील व्यावसायिकांनी एकत्रित येत एक खिडकीद्वारे यापुढे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काही व्यावसायिक सहभागी होत नसल्याचे वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांनी बंदर विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
यामुळे व्यावसायिकांमधील वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी उद्या येथील बंदर कार्यालयात वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांची बैठक आयोजिली आहे. त्यामुळे या बैठकीत प्रादेशिक बंदर अधिकारी कोणता निर्णय देतात याकडे वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.