सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून यामध्ये नव्याने ३६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेकांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं. यावरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.
सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री यावरून शिवसैनिकांत असंतोष आहे. रस्त्यावरील शिवसैनिक बाहेर फेकला गेला आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. मात्र आम्ही नाराज आमदारांशी कोणताही संर्पक केला नाही आम्हाला मोडतोड सरकार नको आहे असं प्रविण दरेकरांनी सांगितले. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर कॅबिनेट मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी शपथ घेतली आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार असं सांगणारे स्वत: मुख्यमंत्री झाले तर मुलाला मंत्री बनवले. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
त्याचसोबत शिवसेनेला कोकणाने १५ आमदार निवडून दिलेत. मात्र शिवसेनेने केवळ एकमेव मंत्री कोकणाच्या वाट्याला दिला. शेवटी ठाकरे सरकारने कोकणावर अन्यायच केला आहे असा आरोपही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने प्रविण दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर शासकीय निवासस्थान म्हणून अ ९ हा बंगला देण्यात आला होता. मात्र आज शासनाने परिपत्रक काढून दरेकरांचा अ ९ बंगला मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे. त्याऐवजी प्रविण दरेकर यांना अवंती ८ हे शासकीय निवासस्थान दिलं आहे. तत्पूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर निवासस्थान देण्यात आलं आहे. मात्र माझा बंगला बदलून दुसरं शासकीय निवासस्थान देण्यात आलं आहे. राज्य सरकारने सुडाच्या भावनेने माझ्यावर अन्याय केला असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.