तळेरे : विकास प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत जिल्ह्यातील २५० गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सामान्य जनतेच्या अडचणी वाढत आहेत. सर्वात मोठी अडचण दररोज पोट भरण्याची असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास प्रबोधिनी संस्था जिल्ह्यातील दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी पुढे सरसावली आहे.
याची सुरुवात कणकवली येथे ४० जणांना तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते वस्तू देऊन करण्यात आली. यावेळी डॉ. विद्याधर तायशेट्ये, हरिभाऊ भिसे उपस्थित होते. यावेळी विकास प्रबोधिनी संस्था अध्यक्षा जयश्री धनावडे, सचिव अनुया कुलकर्णी आणि संस्था सदस्य भिसे यांनी संस्थेचा पुढील उपक्रम ५०० जणांना किट वाटपासाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी मदत करावी, असे आवाहन केले.यावेळी वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये किराणा कीट, तूरडाळ, कांदे, बटाटे, तेल, मसूर, हरभरे, रवा, मीठ, कपडे साबण, अंगाचा साबण, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, इत्यादी वस्तू देण्यात आल्या.आर्थिक नियोजनानुसार धान्य वाटपगेल्या ८ दिवसांत कणकवली, कुडाळ, वैभववाडी व देवगड तालुक्यांतील काही गावांचा सर्व्हे करून मोलमजुरी करणाऱ्या ७५० कुटुंबांची यादी तयार केली. या सर्वांना आवश्यक किराणा मिळेल असे कीट तयार करून ते वाटप करण्याचे ठरविले. त्यानुसार आर्थिक नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात २५० कुटुंबाना संस्थेने धान्याचे वाटप केले.