कुणकेश्वर : देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रणेने समन्वय साधून, एकोप्याने काम करून यात्रा सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुणकेश्वर येथील यात्रा नियोजन बैठकीत दिल्या.कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होत असून यात्रेच्या नियोजनबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कुणकेश्वर मंदीर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, प्रांताधिकारी नीता सावंत, सभापती जयश्री आडिवरेकर, नायब तहसीलदार प्रिया परब, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, कुणकेश्वर उपसरपंच रामानंद वाळके आदी उपस्थित होते.यावर्षी यात्रेचा कालावधी तीन दिवसांचा असून यात्रा चांगल्या पध्दतीने पार पाडावी यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या.
कुणकेश्वर मंदिराकडे तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामार्गे येणाऱ्या रस्त्याचा सुरूचे बन याठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्याच्या भागावर मातीचा भराव टाकून सुस्थितीत करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या.अंतर्गत रस्ते चिंचोळे, अरूंद आहेत. त्यामुळे यात्रेमध्ये रस्ता दुतर्फा थाटण्यात येणारी दुकाने रस्त्याच्या साईडपट्टीपासून मागे घेण्याबाबत नियोजन करावे अशी सूचना पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी केली. या कालावधीत टॉयलेटस, चेजींगरूमची व्यवस्था करावी, फोनचे कॉल ड्रॉप होता नये, रेंज सुरळीत असावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.एसटी प्रशासनामार्फत जिल्ह्यातून १०० गाड्यांचा ताफा यात्रेसाठी ठेवण्यात येणार असून या गाड्या कुणकेश्वर देवगड, कणकवली, मालवण, विजयदुर्ग व जिल्ह्यातील अन्य भागातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात येणार आहेत अशी माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली.ग्रामपंचायतीमार्फत बायोकंटेनर टॉयलेट समुद्र्किनारी ठेवण्यात आले असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजनही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे अशी माहिती ग्रामसेवक पांडुरंग शेटगे यांनी दिली. यात्रेपूर्वी दोन दिवसांत नियोजनबध्द काम करा व यात्रा सुव्यवस्थित, चांगल्या पध्दतीने पार पाडावी असे काम करा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके कार्यरत
- यात्रा कालावधीत तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
- पार्किंग यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये समन्वय असावा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
- यात्रा कालावधीत व्यापारी वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांची एक प्रत स्वत:कडे ठेवावी.
- किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग युनिट ठेवण्यात येणार आहेत
- परवाना नसणाऱ्या व्यापारी, व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना
- कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्युत पोल उभारणार
- राज्य उत्पादन शुल्क विभागाची तीन पथके यात्रा कालावधीत कार्यरत राहणार आहेत