दोडामार्ग : तळेखोलमधील सर्व खडी क्रशर बंद करण्यात यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांचे सुरू असलेले उपोषण सलग पाचव्या दिवशीही सोमवारी सुरू राहिले. सतत पाच दिवस साखळी उपोषण सुरू असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र अद्याप उपोषणस्थळी भेट न दिल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला.तळेखोलमध्ये वारेमाप पद्धतीने सुरू असलेल्या कळ्या दगडाच्या खाणी आणि खडी क्रशर यामुळे गावातील जैवविविधता धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत खडी क्रशर नाव देण्यात आलेले नाहरकत दाखले रद्द करावेत आणि कायमस्वरूपी खडी क्रशर बंद करावेत असा ठरावही घेण्यात आला होता. त्या ठरावाची प्रत सोबत जोडून खडी क्रशर बंद न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा तळेकर ग्रामस्थांनी दिला होता. परंतु तरीसुद्धा खडी क्रशर बंद न झाल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला.गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी खडी क्रशरची पाहणी केली व अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करणार असल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत खडी क्रशर कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने सोमवारी पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.
- अवैध डंपर वाहतुकीवर कारवाई कणकवली तहसीलदारांनी ठोठावला दंड : चार डंपर पकडले
कणकवली : कणकवली ते हळवल जाणाºया रस्त्यावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी शनिवारी सायंकाळी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ४ डंपर पकडले तर तहसीलदार आर. जे. पवार यांनी संबधित डंपर चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच १ लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कणकवली तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची माहिती प्रांताधिकाºयांना मिळाली होती. त्यामुळे शनिवारी सायंकाळी तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह प्रांताधिकाºयांनी कणकवली ते हळवल रस्त्यावर जाऊन चार डंपर पकडले.
त्यांची तपासणी केल्यावर काळ्या खडीचा वाहतूक परवाना नसणे, वाहतूक परवान्यातील विसंगत वेळ आदी कारणांमुळे डंपर कणकवली तहसीलदार कार्यालय आवारात आणण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी संबधित डंपर चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांना १,५१,२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यामध्ये एका डंपरला ३७ हजार ८००, दुसºया डंपरला ५६ हजार ७०० , तिसºया डंपरला १८ हजार ९०० तर चौथ्या डंपरला ३७ हजार ८०० रुपये असा एकूण १ लाख ५१ हजार २०० रुपये दंड ठोठावला आहे. तसेच कार्यालयात दंडाची रक्कम भरल्यानंतर डंपर मालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.