रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नियमित झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जिल्हाभर संततधार धरली आहे. त्यामुळे पाऊस लांबणार, या वृत्ताने चिंंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या २४ तासात एकूण ६४२.८९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ७१.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१२.१४ म्हणजेच सरासरी ३३४.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर येथे मुसळधार, चिपळूण, रत्नागिरी येथे मध्यम, तर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर येथे समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सगळीकडे शेतात बैलजोड्या नांगरतानाचे दृश्य नजरेस पडत आहे. हाच पाऊस आणखी आठ दिवस उशिाराने आला असता तर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला वेग आला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतीची कामे मार्गी लावण्यात गुंतला आहे.सगळीकडे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. सर्व शेतकरी कामात गुंतल्याने याचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे.मात्र, या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान केले आहे. दापोली तालुक्यात मौजे कर्दे येथे एका घराचे ४ हजार रुपयांचे, रत्नागिरी तालुक्यात गावखडी व मौजे उमरे येथील घरांवर झाडे पडली आहेत. मौजे नेवरे येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. गुहागर तालुक्यात मौजे असगोली येथे इंदिरा सोलकर यांच्या घरावर झाड पडल्याने ७६ हजार ३२५ रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बुधवारपासून पाऊस बरसायला लागला असून, आज तिसऱ्या दिवशीही संततधार कायमच राहिली आहे. जिल्ह्यात मोठे नुकसान झाले नसले तरी काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठप्प झालेल्या शेतीच्या कामानी पुन्हा वेग घेतला असून, लवकरच शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल, असे मत काहिंनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पाणीटंचाईही संपुष्टात आली आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम
By admin | Published: June 19, 2015 11:15 PM