चिपळूण : सोलापूरच्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर १६वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी कोल्हापूर विभागीय संघाचे नेतृत्व करून ११ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य पदक मिळवून दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी पदकांची कमाई करत कोल्हापूर विभागाला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा मान मिळवून दिला. जिल्हा व विभागीय स्पर्धेत मजल मारत कोल्हापूर विभागाच्या संघात निवड झालेल्या रत्नागिरीतील खेळाडूंनी राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या यशात भर घातली. विविध वजनी गटात लोबो प्रकारात ११ वर्षांखालील मुलांमध्ये आदित्य कदम सुवर्ण, १४ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथमेश मोरे सुवर्ण, १७ वर्षांखालील मुलांमध्ये दर्शन पाष्टे सुवर्ण, १९ वर्षांखालील मुलांमध्ये सौरभ सकपाळ रौप्य, नविद केळकर सुवर्ण, चेतन सोलकर सुवर्ण, अभिषेक गोरिवले सुवर्ण, खवनके प्रकारात अजिंक्य मानकर सुवर्ण, जासीम काझी कांस्य, मुलींमध्ये स्नेहल महाडिक रौप्य, १९ वर्षांवरील मुलांमध्ये शुभम अवसरे रौप्य, लोबो व खवनके या दोन्ही प्रकारात हुजैफा ठाकूर सुवर्ण व मुलींमध्ये योगिता खाडे सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले. सुशील अरमरे यानेही कोल्हापूर विभागाचे नाव उंचावले. पदक प्राप्त विजेत्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून, राष्ट्रीय सिकई स्पर्धेत हे खेळाडू महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रमुख प्रशिक्षक योगिता खाडे, वीरभद्र कावडे, विनोद राऊत, मंदार साळवी, हुजैफा ठाकूर, चेतन घाणेकर, प्रणीत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्याला ११ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य
By admin | Published: October 12, 2015 9:25 PM