सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केल्याने जिल्हा रुग्णालय गेले चार दिवस ओस पडले आहे. जिल्ह्याची आरोग्य सेवाच खिळखिळी बनली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवरच उपचार शोधण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सर्व काही आलबेल अशा दिमाखात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने वावरत असले तरी जिल्हा रुग्णालय अशा परिस्थितीत सुरु ठेवणे म्हणजे त्यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेच्यावतीने १ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच गेले चार दिवस ठप्प झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्याही रोडावली आहे. रुग्णांचे वॉर्ड ओस पडले आहेत. जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणाच खिळखिळी बनली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवरच उपचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही सर्व काही आलबेल अशा दिमाखात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने वावरत असले तरी जिल्हा रुग्णालय सुरु ठेवणे म्हणजे त्यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. रुग्णांकडून पैसे, भेटवस्तूंची मागणी होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना थेट बाहेरचा रस्ता (अन्य ठिकाणी हलविण्यात येत असल्याच्या) दाखविला जात असल्याच्या तक्रारी सर्रास होत आहेत. यावरून जिल्हा रुग्णालय यंत्रणेवर नियंत्रणच राहिले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. जिल्हा रुग्णालयाने यापूर्वी अनेक नवनवीन उपक्रम राबवून अनेक पुरस्कार मिळविले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात या रुग्णालयाला उतरती कळा लागली असून यंत्रणाच खिळखिळी बनली आहे.त्यातच १ जुलैपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने जिल्हा रुग्णालयाची यंत्रणाच पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने डॉक्टर रुजू होत नाहीत तर जिल्हा रुग्णालयात रुजू झालेले डॉक्टर टिकत नाहीत. याला अनेक कारणे असली तरी कार्यरत डॉक्टरांनाही विविध कारणासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून टार्गेट केले जात असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना अॅडमीट करून घेतले तरी जाब विचारला जातो आणि अॅडमीट केले नाही तरी का अॅडमीट करून घेतले नाही याचे उत्तर विचारले जात आहे. रुग्णवाहिका दिली तरी का दिली आणि नाही म्हटले तरी का नाही म्हटले याचे उत्तर द्यावे लागते. यामध्ये कार्यरत डॉक्टरांची कुचंबणा होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत बोलणेही त्यांना अवघड बनले आहे. शासनाकडून आवश्यक सुविधा व मागण्यांची पूर्तता होत नाही आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून चांगली वागणूक दिली जात नसल्यानेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर यायला तयार होत नसल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा खिळखिळी
By admin | Published: July 06, 2014 12:28 AM