रत्नागिरी : निम्मा आॅक्टोबर महिना संपला तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे वेतनाला विलंब होतो, त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत होऊनही वेतन वेळेवर अदा झालेले नाही.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन अवेळी अदा केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक परजिल्ह्यांतील आहेत. मात्र, वेळेवर वेतन होत नसल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे.वेतन वेळेवर होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत याबाबत जोरदार चर्चा झाली होती. माजी उपाध्यक्ष व सदस्य राजेश मुकादम यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सभेत प्रश्न मांडून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरही वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)बिलांना उशीर झाल्यामुळे...जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांची वेतनाची देयके एकाचवेळी जिल्हा परिषदेकडून पाठविली जातात. मात्र, पंचायत समित्यांकडून देयके वेळेवर सादर केली जात नसल्यानेच मुख्य देयक पाठविण्यास जिल्हा परिषदेकडून विलंब होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
जि. प.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By admin | Published: October 15, 2015 12:11 AM