सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष कुष्ठरोग शोधमोहीम ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान राबविण्यात येणार आहे. कुडाळ, वेंगुर्ला, मालवण व देवगड या चार तालुक्यात कुष्ठरोगाचे रूग्ण आढळल्याने याठिकाणी ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. गेल्या पाच वर्षात कुष्ठरोगाचे ४०४ रूग्ण आढळले आहेत.यावेळी पांढरपट्टे म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम १९५५ साली सुरू झाला. एक उद्देशीय उपचार पद्धतीमध्ये कुष्ठरोगी पूर्ण बरा होण्यास बराच कालावधी लागत होता. जिल्ह्यात कुडाळ व वेंगुर्ला या दोन तालुक्यांमध्ये जास्त रूग्ण तर मालवण व देवगड या तालुक्यांमध्ये रूग्णांची संख्या कमी आढळत असल्याने या चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीच्यावेळी संशयित कुष्ठरोगी शोधून काढले जाणार आहेत व नंतर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.जिल्ह्यात २००९-१०मध्ये ६१ रूग्ण कुष्ठरोगाचे आढळले होते. त्यानंतर २०१०-११मध्ये ६९ रूग्ण, २०११-१२ मध्ये ५७ रूग्ण, २०१२-१३ मध्ये ८४ रूग्ण, २०१३-१४मध्ये ८५ रूग्ण तर २०१४ डिसेंबर अखेर ४८ रूग्ण आढळले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे कुष्ठरोगाविषयी जनजागृती केली जाणार आहे. २३ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नवीन शोधलेल्या रूग्णांना बहुविध औषधोपचार, विकृती प्रतिबंधात्मक सेवा व सल्ला देण्यात येणार आहे, अशीही माहिती पांढरपट्टे यांनी दिली. (प्रतिनिधी)ही आहेत कुष्ठरोगाची लक्षणे व परिणामशरीरावर न खाजणारा न दुखावणारा चट्टा असणे हे कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षण आहे. बऱ्याचवेळा असा चट्टा व्यक्तीला लक्षात येत नाही किंवा त्याच्यापासून कोणताही त्रास नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. योग्यवेळी निदान व उपचारास विलंब झाल्यास अशा रूग्णांमध्ये विकृती येण्याची शक्यता असते. म्हणून अशा रूग्णांचे लवकर निदान होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविणार
By admin | Published: January 15, 2015 10:16 PM