सुरेश बागवे
कडावल (सिंधुदुर्ग) : ज्याच्या शासनाकडे कोणत्याही मागण्या नाहीत अथवा मत्स्य दुष्काळाची भीतीही त्याला कधी शिवत नाही, असा एक अनोखा मच्छिमार सध्या मच्छिमारीचा आपला धर्म नित्यनियमाने पाळत आहे. हा आहे एक सामान्य पक्षी डिचा. हा नेत्रसुखद पक्षी कोकणातील नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्यात गर्क झालेला दिसून येत आहे.पाठ आणि पंखांवर गडद निळा रंग, त्यावर क्वचित हिरव्या छटा, एखाद्या समर्थ चित्रकाराने आपल्या कुशल हातांनी कुंचल्याचा फटकारा अलगद पण अचूक मारावा आणि कुंचल्याचा तो एकच स्ट्रोक समीक्षकांच्याही कौतुकाचा विषय ठरावा, तसा पाणीदार.
डोळ््यांसमोर तरंगणारा लाल-गुलाबी रंग, करडी चोच, पोटाकडील भाग किंचित पिवळसर आणि त्यावर निसर्गाने सौम्य लाल रंगाचा मारलेला स्प्रे आणि तेज गतीने आपल्या भक्ष्याच्या दिशेने अचूक सूर मारण्याचे अंगभूत कौशल्य लाभलेला हा पक्षी सरव्हायव्हर आॅफ फिटेस्टच्या जगात अद्यापही आपले अस्तित्व टिकवून आहे.
पक्षीतज्ज्ञांच्या जगातील सर्वांगसुंदर असा हा ह्यकिंगफिशरह्ण कोकणात मात्र डिचा या काहीशा अडगळीच्या व हास्यास्पद नावाने ओळखला जातो. त्याच्या करड्या रंगाच्या अवाजवी लांबीच्या चोचीमुळेच बहुधा त्याला हे नाव मिळाले असावे. लांब नाकाच्या व्यक्तीला कोकणात डिचो म्हणून हिणविले जाते, ते या पक्ष्याच्या जातकुळीवरूनच. मात्र, याच लांब चोचीचा उपयोग त्याला हवेतून सूर मारून पाण्यातील मासा सहजरित्या पकडण्यासाठी होतो.आचारसंहितेत कधीही खंड पडत नाहीओढे किंवा नदीकाठ ही या पक्ष्याची कर्मभूमी. तेथे शेरणीच्या फांदीवर मस्त झुलत बसावे आणि जवळपास एखादा मासा फिरकला की, डोळ््याचे पाते लवते न लवते अशा तेजतर्रार वेगात सूर मारून त्याला आपल्या लांब-भक्कम चोचीने अलगद टिपून मग पुन्हा त्याच शेरणीच्या फांदीवर बसून आपले उदरभरण करावे, ही या पक्ष्याची जणू आजीवन आचारसंहिता बनली आहे. एकदा का पंख फुटून उडता येऊ लागले की, त्याच्या या आचारसंहितेत कधीही खंड पडत नाही.नदीनाले, ओहोळ परिसरात वास्तव्यकोकणातील बहुतेक नदीनाले, ओहोळ किंवा कोंडींवर या नितांतसुंदर पक्ष्याचे दर्शन सध्या होत आहे. पाण्यातील लहानसहान मासे डिचाचे आवडते खाद्य असून, अनेकदा हे मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येणारे किडे खाण्यासाठी पाण्याच्या लहान प्रवाहाकडे धावतात आणि मग ओढ्याकाठच्या झाडीझुडपात दबा धरून बसलेल्या डिचाचे काम अधिकच सोपे होऊन जाते.