वैभववाडी : नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथील वृद्ध, निराधार देवलकर कुटुंबाची दिवाळी वैभववाडीतील दत्तकृपा प्रतिष्ठानने साजरी केली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला फराळ आणि नवे कोरे कपडे अशी 'दिवाळीभेट' दिली. रामचंद्र भिकाजी देवलकर, आणि त्यांची पत्नी सीताबाई हे सत्तरीपार केलेले निराधार कुटुंब असून त्यांचे प्लास्टिकने झाकलेल्या झोपडीवजा घरात वास्तव्य आहे. या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती समजल्यावर दत्तकृपा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी देवलकर कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या घरातून दिवाळीचा फराळ तर रामचंद्र यांना शर्ट, हाप पॅन्ट व बनियन आणि सीताबाई यांच्यासाठी साड्या असे कपडे विकत घेऊन दत्तकृपा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काही स्थानिक ग्रामस्थांसह दुपारी एकच्या सुमारास देवलकर कुटुंबाच्या घरी पोहोचले. हे लोक तेथे गेले तेव्हा आजारी असलेले रामचंद्र देवलकर औषधे आणण्यासाठी तळरे येथे गेलेल्या पत्नीच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. 15-20 लोक अचानक दारात गेल्यामुळे काहिसे गांगरुन गेलेले रामचंद्र देवलकर काठीचा आधार घेत बाकड्यावरुन उठून दारात थांबलेल्या मंडळी बसण्यास सांगितले. मात्र जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी त्यांना बाकड्यावर बसवून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची ओळख करुन देतानाच तेथे जाण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, नगरसेवक संतोष माईणकर, यांनी फराळ आणि कपडे देवलकर यांना दिले. तेव्हा त्यांना गहिवरुन आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राकेश कुडतरकर, अवधूत माईणकर, रणजित तावडे, सचिन माईणकर, बाबा कोकाटे, प्रवीण पेडणेकर, धोंडू भरडे, भास्कर नाडणकर, सुधीर भरडे, उमेश भरडे, मधुकर देवलकर आदी उपस्थित होते.
दोन महिन्यात पक्के घरदेवलकर कुटुंबाच्या घराची स्थिती पाहिल्यावर त्यांना घर बांधून घेण्याबाबत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची चर्चा झाली. त्यानुसार नाधवडे ग्रामस्थ, दत्तकृपा प्रतिष्ठान, दानशूर व्यक्ती, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन येत्या दोन महिन्यात रामचंद्र व सीताबाई देवलकर यांच्यासाठी छोटेखानी पक्क्या घराची उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.