गुहागर : शौचालयांसह विविध योजनांबाबतच्या अंमलबजावणीची खोटी माहिती देऊ नका, अशा स्पष्ट शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी गुहागर पंचायत समिती आढावा बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुनावले. जनतेने आठवण ठेवली पाहिजे, अशा पद्धतीचे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी २ आॅक्टोबरपासून जानवळे साखरीत्रिशूळ, पालशेत, अडूर, निगुंडळ, चिखली, कोतळूक आदी ठिकाणी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन २५हून अधिक बंधारे बांधून चांगले काम केल्याबद्दल कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर व पाचपेक्षा जास्त बंधारे बांधणाऱ्या सात ग्रामपंचायतींचा तसेच राजेश अंबरे, मोहन घरत आदी सात ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त असल्याचे सांगण्यात आले. अन्य ग्रामपंचायतींचा आढावा घेताना वेलदूर, पडवे, पालशेत आदी ग्रामपंचायतींमध्ये काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत, त्या समजून घेतल्यानंतर बहुतांश ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालय दाखवून हागणदारीमुक्त असल्याचे दाखवल्याने खोटी आकडेवारी देऊ नका, यामुळे ज्यांना वैयक्तिक शौचालय हवे असेल ते वंचित राहतील, असे सांगितले.तसेच वेलदूर, पालशेत ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावीत, असे सांगितले. विहिरींची मोठी बिले लगेच काढली जातात. मग शौचालयाची बिले तांत्रिक मुद्दा दाखवून अडवणूक का करता? असा सवाल त्यांनी केला. गरिबांसाठीच्या या योजनेचे प्राधान्याने काम करा. नरेगाचे ४१ टक्केच काम झाले असल्याचे निदर्शनास येताच जे काम करत नसतील, त्यांना उद्दिष्ट द्या, अन्यथा संबंधितांना नोटीस काढा, असे आदेश देशभ्रतार यांनी दिले.(प्रतिनिधी)
बैठकीत खोटी माहिती देऊ नका : देशभ्रतार
By admin | Published: October 15, 2015 10:05 PM