सावंतवाडी : माझ्या मुलावर हल्ला झाला तो माझा घरगुती प्रश्न आहे. त्यात मंत्री दीपक केसरकर यांनी लुडबूड करू नये. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजनच नाही. म्हणून आता ते व्यक्तिगत आरोप करीत आहेत. पण जनता या सर्व आरोपांना उत्तर देईल, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. तसेच अनेक जुने शिवसैनिकही मला मदत करीत आहेत, असा खुलासाही तेली यांनी केला.भाजप व स्वाभिमान पक्षांच्यावतीने सावंतवाडीतील पाटेकर मंदिरात नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रसाद आरविंदेकर, दादा मालवणकर, केतन आजगावकर, उमेश कोरगावकर, दिलीप भालेकर, बाळ पुराणिक, गुरू मठकर, संदीप हळदणकर, निशांत तोरस्कर, विराग मडकईकर, संजू शिरोडकर, बाळा कुडतरकर, सत्यवान बांदेकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, मोहिनी मडगावकर, समृद्धी विर्नोडकर, अलिशा माटेकर आदी उपस्थित होते.यावेळी तेली म्हणाले, सावंतवाडी हा सूज्ञ लोकांचा मतदारसंघ आहे. आतापर्यंत भावनिक राजकारण करून मतदारांचा गैरफायदा घेण्याचे दिवस संपले आहेत. आता मतदार उघड भूमिका घेऊ लागले आहेत. अनेक आश्वासने दिली गेली, पण एकही आश्वासन सत्यात उतरले नाही. आरोग्याचा तसेच रोजगाराचा प्रश्न आजही कायम आहे. एखाद्या गंभीर जखमी झालेल्या रुग्णालाही गोव्याला घेऊन जावे लागते, असे तेली यांनी सांगितले.माझ्यावर अनेक आरोप करता. माझ्या मुलाचा वापरही राजकारणासाठी मंत्री केसरकर करीत आहेत. यावरून आता विकास न केल्यानेच त्यांना असे मुद्दे घ्यावे लागत आहेत. पण मी त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन करणारा प्रचार करणार नाही. जनतेला विकास काय असतो तेच दाखवून देईन, असे तेली यांनी सांगितले.
माझ्या मुलावर कोणी हल्ला केला आणि काय झाले ते सर्व घरगुुती प्रश्न आहेत. त्याचा विचार मंत्री केसरकर यांनी करू नये. निलेश राणे यांच्या निवडणुकीवेळी यात्रा काढली. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची दिशाभूल करून नगरसेवक फोडले. हे सर्व तुम्हांला चालले मग आताच का राणे वाईट, असा सवालही यावेळी तेली यांनी केला.