वेंगुर्ला : तुळस- वाघेरीवाडी येथील श्रुतिका भागो खरात या ५ वर्षांच्या चिमुरडीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास ह्यकुसडा घणसह्ण या जातीच्या सापाने दंश केला. सुमारे दोन तास उलटल्यानंतर तिला येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्या कुटुंबियांनी दाखल केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तत्काळ उपचार न झाल्यास कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वेंगुर्लेतील विविध डॉक्टरांच्या टीमने एकत्र येत या चिमुरडीवर रात्री २ वाजेपर्यंत सतत उपचार सुरू ठेवले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर त्या मुलीचे प्राण वाचले. येथील डॉ. मुळे यांनी डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. मयूर मणचेकर, डॉ. कोळमकर, डॉ. कपिल मेस्त्री, परीचारीका धोंड व चव्हाण या डॉक्टर टीमच्या सहाय्याने या मुलीचे प्राण वाचवले.
तुळस येथील एका गरीब धनगर समाजाच्या कुटुंबातील श्रुतिका खरात या पाच वर्षांच्या चिमुरडीला गुरुवारी (२१ मे) रात्री ८ वाजता कुसडा सर्प दंश झाला. या कुटुंबाने वेंगुर्ला युवासेना शाखाप्रमुख वैभव फटजीला घटनेची कल्पना दिली. वैभव याने शहरप्रमुख अजित राऊळ, उपशहरप्रमुख अभि मांजरेकर यांच्या मदतीने त्या मुलीला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र सर्प दंश होऊन २ तास उलटल्याने तिचा पाय पूर्ण सुजला होता. शरीरात याचे परिणाम दिसत होते. डॉक्टर कोळमकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ डॉ. मुळे, डॉ. प्रल्हाद मणचेकर यांच्याशी संपर्क साधला.