सिंधुदुर्ग : हेवाळे-राणेवाडीत जंगली हत्तींच्या कळपाने सिध्देश राणे यांच्या केळी बागायतीचे पुन्हा एकदा लाखो रूपयांचे नुकसान केले.
गेल्या आठ दिवसांत सलग तीन वेळा हत्तींनी एकाच बागायतदाराच्या बागायतीत घुसून नुकसान केले आहे. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे राणे हतबल झाले असून, हत्तींपुढे आता करावे तरी काय, असा यक्ष प्रश्न त्यांंच्यासमोर उभा ठाकला आहे.तिलारी खोºयात गेल्या दोन वर्षांपासून हत्ती धुमाकूळ घालीत आहेत. शेतकºयांच्या शेती बागायती पायदळी तुडवत लाखो रूपयांचे नुकसान हत्तींकडून सुरू आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी तर शेतकºयांनी शेती करणेच सोडून दिले आहे.
तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून हा कळप हेवाळे-राणेवाडीत स्थिरावला आहे. याठिकाणी सुशिक्षित बेकार युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून केळी बागायती फुलविल्या आहेत. मात्र, याच बागायतींमध्ये हत्ती सध्या धुडगूस घालून सातत्याने नुकसान करीत आहेत.
सिध्देश राणे या युवकाच्या बागायतीत एकाच आठवड्यात तब्बल तीनवेळा हत्तींनी नुकसान केले. आतापर्यंत १२०० केळींचे नुकसान झाले असून, गुरूवारी रात्री पुन्हा एकदा लाखो रूपयांच्या नुकसानीस राणे यांना सामोरे जावे लागले आहे.