कणकवली: सध्याचा काळ हा संकटाचा असला तरी उद्धव ठाकरे संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी, खाचखळगे आहेत. मात्र, शेवटी विजय निश्चित आहे. येत्या काळात निवडणुकीत गद्दारांना पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा चंग सर्वांनी बांधून कामाला लागावे, असे आवाहन ज्येष्ठ शिवसेना नेते तथा राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली व वैभववाडी तालुक्याचा शिवगर्जना मेळावा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, प्रदीप बोरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, स्नेहा माने, नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, मंगेश लोके, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू शेटये आदी उपस्थित होते.सुभाष देसाई म्हणाले, बाळासाहेबांच्या विचाराच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम आहेत. राज्यातील शिवसैनिकांप्रमाणे येथील शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले गेले आहे तरीही येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळायला हवे यादृष्टीने कामाला लागा. गावागावात जाऊन उद्धव ठाकरे यांचे विचार पोहचवा. असे आवाहन त्यांनी केले.आमदार नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार, खासदार सोडून गेले. चार दिवसांपूर्वी नाव आणि चिन्ह गेले.तरीही पक्षाचे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत. हीच शिवसैनिकांची खरी ताकद आहे.शिवसैनिक हा कोणत्याही वादळामुळे हलणार नाही हे आजच्या उपस्थितीवरून दाखवून दिले आहे. शेवटचा आमदार सोडून गेला तरी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. माझ्या कितीही चौकशा लावा, दबाव आणा तरी आम्ही ठाकरेंसोबत राहणार आहोत. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांमुळे दोन वेळा आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे लढायचं ते जिंकेपर्यंत आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे शिवसेनेसोबतच आपण राहणार आहे.
अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे कारण ज्या ज्यावेळी शिवसैनिक पेटून उठतो त्यावेळी त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. जे जे शिवसेनेला सोडून गेले त्यांचे काय झाले हे जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे. आज भाजप निवडणुकीपासून लांब पळत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आहेत. या निवडणुकांची लोक वाट बघत आहेत. त्यावेळी भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध करून दिला. ज्यावेळी कोरोना महामारीचे संकट, तोक्ते वादळाचे संकट होते त्यावेळी सर्वप्रथम शिवसैनिकच मदतीसाठी धावून आला होता. त्यावेळी भाजपची माणसे कुठे होती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.