दापोली : परप्रांतीय पर्ससीननेट बोटी महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करू लागल्याने स्थानिक मच्छिमारांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय मच्छिमार असा संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. त्यातूनच परप्रांतीय बोटीने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हर्णै बंदरातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटी बंद ठेवण्यात आल्या.मच्छिमारांनी शुक्रवारी हर्णै येथे एक बैठक घेतली. दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे, मच्छिमार नेते जेस्लम अकबानी, नारायण रघुवीर, हर्णै-पाजपंढरी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन पी. एन. चौगले, संघर्ष समिती अध्यक्ष अनंत पाटील, मच्छिमार नेते रऊफ हजवाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्यासह गुहागर, दापोली, मंडणगड या तीन तालुक्यांतील मच्छिमार सोसायटीचे चेअरमन व मच्छिमार उपस्थित होते.दापोली तालुक्यातील हर्णै-पाजपंढरी येथील बोटीवर जयगड समुद्रात काल झालेल्या हल्ल्याचा निषेध करत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परप्रांतीय बोटींना अटकाव करा, स्थानिक मासेमारीच्या हद्दीत परवानगी देऊ नये, स्थानिक मच्छिमारांची हद्द वाढवून देण्यात यावी, पर्ससीन नेट मासेमारी बोटींची हद्द सरकारने ठरवून द्यावी, त्याहीपेक्षा प्रत्येक राज्यातील बोटीने आपापल्या हद्दीतच मासेमारी करावी, प्रत्येक राज्यातील बोटींना वेगवेगळी निशाणी देण्यात यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.हर्णै बंदरातील स्थानिक पारंपरिक मच्छिमार एकवटले असून, परप्रांतीय बोटी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्यास आम्ही कायदा हातात घेऊन परप्रांतीय बोटींना अटकाव करू.अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशाराही स्थानिक मच्छिमारांनी दिला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कल्पना गोडे यांच्याकडे दिले.यावेळी पी. एन. चौगुले, रऊफ हजवाने, अनंत पाटील यांनी मच्छिमारांना मार्गदर्शन केले. रविवारी पकडलेली बोट हर्णै बंदरात उभी असून, या बोटीला कोणीही नुकसान करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. परप्रांतीय बोटीची दादागिरी थांबली नाही तर तीन जिल्ह्यातील मच्छिमार मिळून मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. (प्रतिनिधी)
परप्रांतियांच्या निषेधार्थ हर्णैत बोटी बंद
By admin | Published: February 20, 2015 11:19 PM