ओरोस : मालवण तालुक्यातील चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेले कोव्हॅक्सिनचे २५० डोस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर अन्यत्र दिले असल्याचा खळबळजनक आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी आरोग्य समितीच्या सभेत केला. तसेच हे डोस गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आरोग्य समिती सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, समिती सदस्य हरी खोबरेकर, प्रितेश राऊळ, नूतन आईर, लॉरेन्स मान्येकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. याबाबत आढावा घेतला असता चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी या लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या केंद्रासाठी २५० कोव्हॅक्सिनचे डोस मंजूर करण्यात आले होते.मात्र, प्रत्यक्षात हे डोस चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेच नाहीत. ते डोस परस्पर अन्यत्र देण्यात आले असल्याचा आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी सभेत केला. तसेच या आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेले कोव्हॅक्सिनचे २५० डोस कोठे गेले, कोणाच्या मर्जीने अन्यत्र देऊन चौके पंचक्रोशीतील ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करत आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना धारेवर धरले. मात्र यावर आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
त्यामुळे लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. खनिज निधीमधून मिळणाऱ्या रुग्णवाहिका देताना रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी सदस्य प्रितेश राऊळ यांनी केली. पीपीई किट देण्याबाबत तसेच टेक्निशियनची रिक्त पदे भरण्याबाबत सभेत ठराव घेण्यात आला.कोरोना मृत्युदरात जिल्हा आघाडीवर : मान्येकरजिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करण्याठी आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. तसेच डॉक्टरअभावी उपचार होत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना मृत्युदरात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर गेला असल्याचे सांगत याला शासन जबाबदार असल्याचा आरोप लॉरेन्स मान्येकर यांनी केला. तसेच शासनाला उशिरा शहाणपण सुचल्याने जिल्ह्यासाठी २५ डॉक्टर दिले. मात्र, त्यापैकी केवळ १२ डॉक्टर हजर झाले आल्याचे सांगत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणीही मान्येकर यांनी केली.