सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेले ३० लाख रुपये वाचविण्यात या बँकेला यश मिळाले आहे. व्यक्तिगत खात्यावर आॅनलाईन फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, बँकांनाही या हॅकर्सनी लक्ष्य केल्याने बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालू खाते आयडीबीआय बँक शाखा पणजी-गोवा येथे आहे. या खात्यामधून जिल्हा बँक आपल्या ग्राहकांना फंड वर्ग करीत असते.
असे फंड वर्ग करीत असताना जिल्हा बँकेच्या अधिकृत मेलवरून आयडीबीआय बँकेत सूचना दिल्या जातात. या सूचना प्राप्त झाल्यावर सूचनापत्रातील तपशिलाप्रमाणे आयडीबीआय बँक फंड वर्ग करण्याची कार्यवाही करीत असते.अलीकडेच जिल्हा बँकेने आयडीबीआय या बँकेत आपल्या मेलद्वारे फंड वर्ग करण्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नसतानाही या बँकेने दिल्ली येथील यस बँकेच्या शाखेला त्या शाखेतील एका ग्राहकाच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे ३० लाख रुपये रक्कम वर्ग केल्याचे जिल्हा बँकेच्या अकाऊंट विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
या अधिकाऱ्यांनी ही बाब तत्काळ आयडीबीआय बँकेच्या निदर्शनास आणली. जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखवून केलेल्या कार्यवाहीमुळे आरटीजीएस असूनही ही ३० लाख रुपये एवढी रक्कम यस बँकेच्या पातळीवर राखून ठेवण्यात बँकेला यश मिळाले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती घेता जिल्हा बँकेचे ई-मेल खाते हॅक करून व बनावट ई-मेलद्वारे आयडीबीआय बँकेची दिशाभूल करून जिल्हा बँकेस फसविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची रितसर तक्रार जिल्हा बँकेच्यावतीने सायबर सेल पोलीस दलाकडे तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.संगणक विभागाची सतर्कताग्राहकांना फसवून त्यांच्याकडून त्यांचे एटीएम नंबर तसेच खाते नंबर घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे काढून फसविण्याचे प्रकार नित्य कानावर येत असतात. मात्र, हॅकर्सद्वारे प्रत्यक्ष बँकेलाच फसविण्याचा प्रकार समोर आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पणजी-गोवा येथील आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून ३0 लाख रुपये एवढी रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न हॅकर्सद्वारे झाला होता. मात्र, जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखविल्याने या बँकेची तब्बल तीस लाख रुपयांची होणारी फसगत थांबविता आली आहे.